लातूर : प्रतिनिधी
काळाची गरज ओळखून आणि भविष्याचा वेध घेऊन विलास सहकारी साखर कारखान्यासह मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करतील. ऊस तोडणीत १०० टक्के यांत्रिकीकरण आणतील, सीबीजी सारख्या नाविन्यपूर्ण उपपदार्थाची निर्मिती करतील. या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचे प्रयत्न अखंडपणे सुरू राहतील. राज्यात उद्योग बंद पडत असताना आणि बेरोजगारी वाढत असताना मांजरा परिवारातील सर्व कारखाने शेतकरी हिताला प्राधान्य देत भक्कमपणे उभे आहेत. कारखान्याला आजवर मिळालेले ३९ पुरस्कार हे सर्व सभासदांच्या सहकार्याचे फलित आहे, असे सांगून मांजरा परिवारातील कारखान्यांमध्ये उसाला उच्चांकी भाव देण्याची निकोप स्पर्धा अशीच कायम राहील, असा विश्वास विलास सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
विलास सहकारी साखर कारखाना ली. वैशालीनगर (निवळी, ता. जि. लातूर) अधिमंडळाची सन २०२५-२६ ची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी शहरातील हॉटेल वैष्णव येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी आमदार, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, महापौर जयश्री सोनकांबळे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी जवळगेकर, लातूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या गटनेता आशाताई भिसे, श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील, माजी चेअरमन गणपतराव बाजूळगे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश बेद्रे, लातूर पंचायत समितीचे उपसभापती महेश चव्हाण, ऊसतज्ज्ञ सुरेश माने पाटील, दत्ता टेकाळे, गुरुनाथ गवळी, संभाजी रेड्डी, मारुती पांडे, कैलास पाटील, भालचंद्र सोनकांबळे, चंद्रकांत धायगुडे, विष्णू धायगुडे, विलास सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री रविंद्र काळे, नरसिंग बुलबुले, रसुल पटेल, अनंत बारबोले, रंजीत पाटील, गोवर्धन मोरे, तात्यासाहेब पालकर, नेताजी साळुंके (देशमुख), नितीन पाटील, रामराव साळुंके, अमृत जाधव, सतिष शिंदे (पाटील), लताबाई देशमुख ,दिपक बनसोडे, शाम बरुरे, सुभाष माने, कार्यकारी संचालक युनीट-१ आबासाहेब पाटील, युनीट-२ कार्यकारी संचालक आत्माराम पवार आदीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, मांजरा परिवारातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, विलास सहकारी साखर कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधुनिक तंत्रज्ञान व उच्चांकी भावासाठी प्रयत्नशील :
सभेला संबोधित करताना आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या प्रेरणेतून लातूर तालुक्यात मांजरा कारखान्यापाठोपाठ विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. आज २४ वर्षांच्या यशस्वी प्रवासात सभासदांची खंबीर साथ लाभली आहे. येणा-या काळात उसाचे नवनवीन वाण, वाढीव उत्पादकता, अधिक साखर उतारा आणि आधुनिक ऊसशेतीचा अभ्यास करण्यासाठी शेतक-यांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातील. पुढे बोलताना ते म्हणाले, सध्या राज्यात उद्योग बंद पडत आहेत त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. अशा परिस्थितीत मांजरा परीवार मोठया प्रमाणात रोजगार निर्माण करीत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पारदर्शक नोकर भरती केली आहे. ही नोकर भरती माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पारदर्शकता व गुणवत्तेला प्राधान्य देऊन झाली आहे. बॅकेचे चेअरमन धिरज देशमुख हे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सक्षमीकरण करत आहेत. ही बॅक आता एसबीआय, आयसीआय, एचडीएफसी बॅकेप्रमाणे सुविधा देत आहे.
सहकार क्षेत्रातील मांजरा परिवाराची भूमिका शेतकरीहिताची :
खासदार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले, अनेक आव्हाने असतानाही लोकनेते विलासराव देशमुख आणि सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरा परिवारातील सर्व कारखाने अतिशय उत्तम पद्धतीने चालत आहेत. सहकार क्षेत्रात काम करताना शेतक-यांचे हित जपणा-या या परिवाराला सर्वांनी कायम खंबीर साथ द्यावी, असे आवाहन केले.
उत्पादन वाढीसाठी ‘एआय’; तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक :
यावेळी बोलताना माजी आमदार धिरज देशमुख म्हणाले, सन २००० मध्ये ज्यावेळी आदरणीय सोनिया गांधी यांच्या हस्ते या विलास सहकारी साखर कारखान्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी कारखाना आपल्याला समर्पित करतो, असे भैय्यासाहेब म्हणाले तो दिवस आणि आजचा दिवस हा चढता प्रवास वाढता आलेख आपण पाहतोय. अनेक साखर कारखाने आज अवसायनात निघताना बंद पडतात पण विलास सहकारी साखर कारखान्याने मांजरा परिवारातील एक उत्कृष्ट कारखाना म्हणून कामगिरी केली आहे. राज्यातील व देशातील अनेक साखर कारखान्याच्या माध्यमातून सरकारला कर मिळतो तरीही याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि धोरणे म्हणावी तितकी ठीक नाहीत, असे असले तरी आपण प्रत्येक गोष्टीला टीकेला सडेतोड उत्तर द्यावे लागेल. आपल्याला एआय तंत्रज्ञानाचा वापर आपले उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना यांनी प्रयत्न करावे लागतील. आपण सत्तेत नसताना विरोधी पक्षाच्या कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुका बिनविरोध कशा होतात, असा प्रश विरोधकांना पडतो. आपल्याला येणा-या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात ऊसापासून इंधन निर्मिती करून आपला दबदबा कसा निर्माण करता येईल यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत आणि आपल्या शेतकरी सभासद बांधवांना अधिकाधिक भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असावे असे म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन, माजी आमदार वैजनाथराव शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये उत्कृष्ट कार्य करणारे ऊस उत्पादक शेतकरी, ट्रक व ट्रॅक्टर ऊस वाहतूक ठेकेदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दरम्यान, कारखान्यास ‘उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. सभेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी विषयांचे वाचन केले, त्यास उपस्थित सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्वानुमते मंजुरी दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी हॉटेल वैष्णवचा बँक्वेट हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते विष्णु धायगुडे, चंद्रकांत धायगुडे व धायगुडे परिवाराचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहूल इंगळे यांनी तर आभार कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी मानले.
















