मुंबई : सरकारने राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. जवळपास ७५ टक्के महाराष्ट्र हा दुष्काळाच्या टाचेखाली आला आहे. ही भीषण परिस्थिती ओढवल्याने शेतकरीच नाही तर सामान्य नागरिकही धास्तावला आहे. कोरडा दुष्काळ जाहीर होताच तात्काळ युद्ध पातळीवर सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. पंचनामे सुरू झाले आहेत, अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. तर राज्यातील शेतक-यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्दही शिंदे यांनी दिला. शिवसैनिक सुद्धा जातीने मदतीसाठी हजर राहतील असे ठाम वचन दिले.
राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांत सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला, याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे भाष्य केले. दुष्काळी भागाची पाहणी करून आल्यानंतर कालच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. त्याप्रमाणे २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. दिलेला शब्द पाळणारे आमचे सरकार आहे. जे बोलतो ते आम्ही करतो. शेतात काही उरलेले नाही. उभे पीक करपले आहे, अशी व्यथा शेतकरी मांडत होते. तेव्हा आम्ही त्यांना खचून जाऊ नका, धीर सोडू नका. सरकार तुम्हाला आधार देणार. तुमच्या पाठीशी राहणार असा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आम्ही कोरडा दुष्काळ जाहीर केला, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कोरड्या दुष्काळांतर्गत ज्या काही योजना आहेत, सवलती आहेत, कर्जाचे पुनर्गठण आहे, कर्जमाफी आहे, शेतसारा आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांना चारा असेल, अशा १२ प्रकारच्या सवलती या शेतक-यांना मिळतील. शेतक-यांना मोठा आधार मिळेल. शेतक-यांनी खचून जाऊ नये. एक शेतकरी रडत आला, आत्महत्येशिवाय मला पर्याय नाही असे म्हणाला. मुलाचं शिक्षण कसं करणार, फी कशी भरणार, खाणार काय? असे तो म्हणाला. मी त्याला एकच सांगितले, की सरकारने तुमची जबाबदारी घेतली आहे. आम्ही बोलणारे नाही तर करणारे आहोत. तुम्ही काळजी करू नका. दोन ते तीन दिवसांत तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे सांगितल्याचे शिंदे यांनी माहिती दिली.
तात्काळ, युद्धपातळीवर जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून ग्रामसेवक असतील, तलाठी हे पंचनामे करतील. शेतक-यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील. गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीही सरकारने अशीच पावले टाकली होती. यावेळी सुद्धा सांगतो की शेतक-यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. शेतक-यांना जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे. पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार आहे. शेतीसाठी कर्ज घेतले असेल तर त्याला स्थगिती आहे. कृषीपंपासाठीच्या वीज बिलात सूट देण्यात येणार आहे. वीज खंडीत होणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळेल. रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणि जनावरांच्या पाणी-चा-याची सोय करून देण्यात येणार आहे. अन्नधान्याची व्यवस्था करून देण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
















