पुणे : प्रतिनिधी
राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून ३२ हजार कोटींचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. तसेच शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितली.
नीती आयोगाच्या वतीने देशाचा आधुनिक उत्पादन प्रकल्पाबाबत व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे त्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी ते येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले शेतक-यांचे प्रश्न आंदोलन करून सुटणार नाहीत तर त्याची सोडवणूक चर्चेच्या माध्यमातून करण्यात येईल.
मध्यंतरीच्या जोरदार पावसामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतक-यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्याचा एक भाग म्हणजे शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बावनकुळे हे त्यांच्या संपर्कात आहेत.
उत्पादन प्रकल्पाबाबत केंद्र महाराष्ट्रात व्हावे यासाठी शासन योग्य ते सहकार्य करण्यास तयार आहे असे नमूद करून ते म्हणाले, या नियोजित केंद्रामुळे रोजगारनिर्मितीला आणखी चालना मिळणार आहे.

