मुंबई : प्रतिनिधी
स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार २०२६ मध्ये एल निनो हा पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात एल निनोची चिन्हे दिसू लागली असून त्यामुळे जगातील अनेक भागांत प्रतिकूल हवामान परिस्थिती निर्माण होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, २०२६ च्या उत्तरार्धात एल निनो सुरू होऊ शकतो. तो भारतीय मान्सूनच्या काळात अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे आणि उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात त्याचा प्रभाव शिखरावर पोहोचू शकतो. यामुळे दक्षिण आशियासह अनेक भागांमध्ये हवामान बदलाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. विशेषत: भारतात मान्सूनचा पाऊस कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जगभरातील हवामानावर परिणाम
‘एल निनो’चा परिणाम जगभरातील हवामानावर होतो. यामुळे पावसाचे स्वरूप बदलते आणि काही भागांत दुष्काळसदृ्श्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशिया आणि भारतीय उपखंड हे प्रदेश यामुळे जास्त प्रभावित होतात. भारतातील खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदरने सर्वप्रथम २०२६ च्या मान्सूनमध्ये एल निनोचा प्रभाव दिसू शकतो असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर इतर हवामान संस्थांनीही या शक्यतेला दुजोरा दिला आहे.
जुलैच्या सुमारास प्रभाव वाढण्याची शक्यता
आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील हवामानावर लक्ष ठेवणारी संस्था ने देखील इशारा दिला आहे की जुलै २०२६ च्या सुमारास एल निनो सक्रिय होऊ शकतो. याचा परिणाम जून ते सप्टेंबर दरम्यान होणा-या भारतीय मान्सूनवर होण्याची शक्यता आहे.
सध्या ‘ला निना’ होतोय कमकुवत
सध्या ला निना सक्रिय असला तरी ती हळूहळू कमकुवत होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तिचा परिणाम वसंत ऋतूच्या सुरुवातीपर्यंत दिसू शकतो. त्यानंतर उन्हाळ्यात हवामान ‘तटस्थ’ स्थितीत जाण्याची शक्यता आहे.

