24.6 C
Latur
Tuesday, June 24, 2025
Homeमहाराष्ट्रशेतात सडलेल्या टमाट्यांचा लाल चिखल

शेतात सडलेल्या टमाट्यांचा लाल चिखल

अवकाळीने सर्व हिरावले; शेतक-याचे अश्रू अनावर

बीड : प्रतिनिधी
राज्यात मागील आठवड्यापर्यंत अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतक-याला आर्थिक फटका बसला आहे. अशातच आष्टी तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतक-याचे अवकाळीने सर्व काही हिरावून घेतले असून परिपक्व होऊन पिकलेल्या लाल टोमॅटोंचा लाल चिखल आता शेतात पाहण्यास मिळत आहे. शून्य उत्पादन आल्याने आणि शेतात पडलेला टोमॅटोंचा सडा पाहून शेतक-याचे अश्रू अनावर झाले होते.

राज्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. आष्टी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात अवकाळीचा फटका बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आष्टी तालुक्यातील राम गोरख शेळके यांची टोमॅटोची शेती अवकाळीमुळे पूर्णपणे खराब झाली आहे. परिणामी बाग उपटून टाकली आहे.

अवकाळीने सर्व शेती झाली लाल
बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील मिस्त्री काम करत शेतकरी राम गोरख शेळके यांनी ऐंशी हजार रुपये खर्च करून टोमॅटोची बाग फुलवली होती. सव्वा एक्करमध्ये सात हजार टोमॅटोच्या झाडांची लागवड करून एप्रिलमध्ये ठिबकने पाणी देऊन शेती फुलवली होती. ऐन तोडणीला आलेली बाग अवकाळीने सर्वच शेतात पाणी साचल्याने जळून गेली. आज शेतात सर्वत्र लालबुंद झालेले टोमॅटो सडून गेले आहेत.

आता हातात एक रुपयाही नाही
जवळपास सात लाख रुपये उत्पन्न टोमॅटोमधून झाले असते. पण आज एकही रुपया पदरात न पडता, उलट ही बाग उपटून टाकण्यासाठी मजुरांना द्यायला देखील पैसे नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच शेतीची मशागत कशी करायची, आम्ही कसे जगायचे हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. मायबाप सरकारने आम्हाला थोडीफार का होईना मदत द्यावी; अशी मागणी शेतकरी राम शेळके यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR