लातूर : प्रतिनिधी
नोव्हेंबर महिना सुरू होताच पावसाचा जोर ओसरला आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकरी खरीप हंगामातील पिके काढून शेती रब्बी हंगामासाठी तयार करत आहेत. जिल्हयात गेल्या आठ दिवसापासून पेरण्या सुरू झाल्या असून आजपर्यंत जवळपास ८२ हजार ३६४ हेक्टरवर रब्बीचा (२५.८४ टक्के) पेरा झाला आहे. पावसाच्या उघडीपनंतर शेतीच्या मशागती व पेरण्यांनी वेग झाला आहे.
जिल्हयात मे, जून पासून पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पेरण्या व पिक वाढीसाठी पोषक असाच पाऊस पडला. तसेच सप्टेंबर अखेर अतिवृष्टी होऊन खरीप हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असतानाच पावसाचा शेतक-यांना सामना करावा लागला. त्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करण्यासाठी पावसाचा आडसर ठरला. सध्या पाऊस थांबल्याने शेतीच्या मशागतीला वेग आला असून पेरण्याही सुरू झाल्या आहेत.
जिल्हयात यावर्षी १०२५.४ मिमी पाऊस झाला असून लातूर तालुक्यात ९१०.१ मिमी, औसा तालुक्यात ९२१.२ मिमी, अहमदपूर तालुक्यात १२१४.२ मिमी, निलंगा तालुक्यात ९६४.३ मिमी, उदगीर तालुक्यात ११२२ मिमी, चाकूर तालुक्यात १०६२.७ मिमी, रेणापूर तालुक्यात ९८२.१ मिमी, देवणी तालुक्यात १०२० मिमी, शिरूर अनंतपाळ १२१४.४ मिमी, तर जळकोट तालुक्यात १०३९.४ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हयात रब्बी पिकांसाठी मुबलक पाणी साठा उपलब्ध होणार आहे.

