शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तिपराळ शिवारात सर्वे नंबर २२ मधून विद्युत तारा गेल्या असून यात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत विठ्ठलराव पाटील या शेतक-याचा सुमारे एक हेक्टर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वीज वाहिनीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अचानक ठिणग्या पडून उसाच्या शेताला आग लागली. उसाचे पीक पूर्ण वाढीला आलेले असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु या आगीत त्यांच्या एक हेक्टर ऊसासह शेजारील ऊस देखील जळाला आहे.
या आगीत अंदाजे एक हेक्टर क्षेत्रावरील ऊस पूर्णत: जळून गेल्याने संबंधित शेतक-याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल व वीज वितरण विभागाच्या अधिका-यांनी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पीक विमा व शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी विठ्ठलराव पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे. अवकाळी संकटे आणि अपघाती आगीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.

