28.1 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeलातूरशोकाकूल वातावरणात शिवराज पाटील यांना श्रध्दांजली 

शोकाकूल वातावरणात शिवराज पाटील यांना श्रध्दांजली 

लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, पंजाबचे माजी राज्यपाल, भारतीय राजकारणातील सुसंस्कृत, निष्कलंक, अभ्यासू आणि संसदीय परंपरा जपणारे नेते शिवराज पाटील चाकुरकर यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी लातूर शहराजवळील वरवंटी येथील त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना शिवराज पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित राहून शिवराज पाटील चाकुरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शिवराज पाटील यांनी राष्ट्रासाठी समर्पित भावनेने कार्य केले 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असल्याचे सांगून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ म्हणाले की, राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करणारा आणि लोकशाहीला मजबूत बनविण्यासाठी प्रयत्न करणारा एक विनम्र राजकारणी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने मोठे नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
एक आदर्श नेता आपल्यातून निघून गेला
चिंतनशील राजकारणी अशी ओळख असलेले शिवराज पाटील चाकूरकर हे आपल्यासाठी एक मार्गदर्शक, एक आदर्श होते. त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध मंत्री पदे भूषवत देशाची सेवा केली. लोकसभा अध्यक्ष असताना त्यांनी केलेले काम संस्मरणीय होते, असे सांगून कर्नाटक राज्याचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी त्यांना कर्नाटक सरकारच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली.
वैचारिक मूल्य जपणारे नेतृत्व हरपले
शिवराज पाटील चाकूरकर यांनी नगरपरिषदेचे अध्यक्ष ते लोकसभेचे अध्यक्ष पदापर्यंतच्या जबाबदा-या यशस्वीपणे सांभाळल्या. अतिशय शिस्तप्रिय आणि वैचारिक मूल्य असणारे राजकारण, सर्वांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकीय जीवनाचे वैशिष्ट्य होते. त्यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय वेदनादायी असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
अजातशत्रू, चिंतनशील नेत्याची उणिव सर्वांना जाणवेल 
गेली सहा दशके राज्याची, देशाची प्रामाणिकपणे सेवा करताना शिवराज पाटील चाकूरकर यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला, सुशिक्षित युवा वर्ग यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आपल्या पदांचा उपयोग केला. ते एक अजातशत्रू, चिंतनशील, अभ्यासू व तत्वनिष्ठ राजकारणी होते. त्यांची उणीव सर्वांना जाणवेल, अशी भावना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केली.
सुसंस्कृत नेत्याचा वारसा पुढे नेऊ 
शिवराज पाटील चाकूरकर हे सुसंस्कृत राजकारणी म्हणून परिचित होते. लातूर जिल्ह्याच्या राजकारणाला सुसंस्कृत बनविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाचा वारसा पुढे घेऊन जाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यावेळी म्हणाले.
उत्तम मार्गदर्शक हरपले 
खासदार म्हणून काम करताना शिवराज पाटील चाकूरकर यांचे आपल्याला सदैव मार्गदर्शन लाभल्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले. तसेच त्याबाबतच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या.
शिवराज पाटील यांच्या  निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली
सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न राजकारणी अशी ओळख असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या जवळपास साठ वर्षांच्या राजकारणात त्यांनी अनेकांना घडविले. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याचे माजी मंत्री बसवराज पाटील यावेळी म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन शिवराज पाटील चाकुरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली  वाहिली. श्रद्धांजलीनंतर गार्ड ऑफ ऑनर, बंदूकीच्या तीन फैरींची सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रध्वज शिवराज पाटील चाकुरकर यांचे सुपूत्र शैलेश पाटील, स्नूषा डॉ. अर्चना पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर अंतिम सलामी देण्यात आली. उपस्थित शोकाकुल जनसमुदायाने दोन मिनीटे स्तब्धता पाळून शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण  केली.
यावेळी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कर्नाटकमधील आमदार बी. आर. पाटील, महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, प्रदीप राठी, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, दिलीप माने, अमर राजूरकर, सुधाकर भालेराव, अभय साळूंके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR