अहमदपूर : प्रतिनिधी
साने गुरुजी यांनी लिहिलेल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकात त्यांच्या आईने त्यांच्या लहानपणी त्यांच्यावर केलेल्या संस्काराच्या गोष्टी खूप अशा अनमोल आहेत. त्यामुळे शामची आई या पुस्तकाचे वाचन घरा-घरात व्हावे, असे प्रतिपादन, उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायभोळे यांनी केले.
संत ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजित पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस आणि मानस फाऊंडेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव तथा प्राचार्य श्रीमती रेखाताई हाके- पाटील, स्पर्धेचे निरीक्षक प्रा. गुरुनाथ चवळे, निरीक्षक प्रा. डी. एन. माने, साहित्यीक मेनका धुमाळ, राज्य आदर्श शिक्षक सुर्यकांत बोईनवाड, कथामालेचे लातूर जिल्हा संयोजक राम तत्तापुरे, सहसंयोजक संगीता आबंदे, मुख्याध्यापक आशा रोडगे- तत्तापुरे, मुख्याध्यापक मीना तोवर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत बालगटात इयत्ता पाचवी ते सातवी यात ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते.जिल्ह्यात सर्वप्रथम जिजामाता कन्या विद्यालय लातूरची श्वेता सचिन वीर, यशवंत विद्यालय अहमदपूरची ईकरा इस्माईल शेख द्वितीय तर संत ज्ञानेश्वर विद्याल अहमदपूरची कु. स्वरा शिवदास बोळेगावे ही तृतीय क्रमांक आला आहे. किशोर गटात इयत्ता आठवी ते दहावी यात सर्वप्रथम जिजामाता कन्या विद्यालय लातूरची कु. स्रेहा संजय सूर्यवंशी व द्वितीय संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूरची संध्या राहुल हुडगे तर तृतीय संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूरची श्रुती गजानन हाके यांनी पारितोषिक पटकावले आहे. विजयी स्पर्धकांना ट्रॉफी, सन्मानपत्र, श्यामची आई हा ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी निरीक्षक प्रा.डी एन माने यांचे मनोगत पर भाषण झाले. अध्यक्षीय समारोप प्राचार्या रेखाताई हाके- पाटील यांच्या भाषणाने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक राम तत्तापुरे यांनी सुत्रसंचालन संगिता आबंदे- पाटील यांनी तर आभार आशा रोडगे- तत्तापुरे यांनी मानले. कार्यक्रमाचा शुभारंभ प पू.साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेने करण्यात आला तर समारोप पसायदानाने करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले.

