लातूर : प्रतिनिधी
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी श्रीमती मानसी यांनी दि. १३ जून रोजी लातूर शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी विविध विभागांचा सुमारे ५ तास आढावा घेतला. लातूर महानगरपालिकेचा लौकिक वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वजण मिळून काम करु,असे त्या म्हणाल्या.
श्रीमती मानसी या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. तेथून त्यांची लातूर मनपा आयुक्त म्हणून नुकतीच बदली झाली .शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी अधिका-यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीमती मानसी यांनी लागलीच एका मागोमाग एक पालिकेतील सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला. सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत सर्व विभागांच्या बैठका त्यांनी घेतल्या. काम करताना पालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांनी उद्दिष्ट समोर ठेवावे.
कमी कालावधीत पूर्ण होणारी व दीर्घ कालावधी लागणारी कामे असे वर्गीकरण करून ही उद्दिष्टे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. शहरातील नागरिकांना मनपाकडून अधिकाधिक सेवा, सुविधा देता याव्यात यासाठी आपण सर्वांनी काम करायचे आहे. यामाध्यमातून लातूर महानगरपालिकेचा लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वजण मिळून काम करू, असे श्रीमती मानसी यावेळी बोलताना म्हणाल्या.