लातूर : प्रतिनिधी
येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयातील अंतरिक गुणवत्ता हमी कक्ष आणि हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन विशेष औचित्य साधून प्रश्नमंजुषा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचा ७५ वा अमृत महोत्सव आणि १० जानेवारी विश्व हिंदी भाषा दिवस यांचे निमित्त साधून हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हिंदी भाषेचा प्रचार ही काळाची गरज आहे. त्याचाच भाग हिंदी भाषेवर आधारित प्रश्नमंजुषा प्रतियोगिता आहे. विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे हे ही सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सविता कीर्ते यांनी विश्व हिंदी भाषा दिवसाचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या की, हिंदी भाषाच्या सर्वांगीण विकासासाठी तिचा प्रचार आणि प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण ५१ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करून, आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जीवन साबळे व नानासाहेब देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोप प्रा. सुप्रिया राठोड यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

