Homeमहाराष्ट्रश्री अंबाबाई मंदिराच्या ऐतिहासिक दगडी भिंतींचे खुलले मूळ रूप

श्री अंबाबाई मंदिराच्या ऐतिहासिक दगडी भिंतींचे खुलले मूळ रूप

 अंबाबाईची मूर्ती दर्शनासाठी खुली; विकास प्रकल्पांतर्गत चार दिवसांनी संवर्धन प्रक्रिया पूर्ण

कोल्हापूर : प्रतिनिधी
मंदिर व मूर्ती जतन-संवर्धनाच्या कामासाठी गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन बुधवारपासून पूर्ववत सुरू झाले. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता अंबाबाईच्या मूळ मूर्तीत प्राणप्रतिष्ठा, अभिषेक व आरती करून देवीच्या दर्शनाला सुरुवात झाल्यानंतर भाविकांनी ‘अंबा माता की जय’चा गजर केला. सॅन्ड ब्लास्टिंगसह संवर्धनाची कामे झाल्याने मंदिराच्या दगडांचेही मूळ सौंदर्य खुलले आहे.

अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यातील संवर्धन व जतन विकासकामे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यामध्ये मंदिर आवारातील छोटी मंदिरे, शिल्पाकृती, दगडी भिंती यांच्यावर संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली होती. १४ मार्च रोजी अंबाबाई मंदिराच्या गाभा-यातील दगडी भिंतीच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले होते, पुरातत्त्व विभागाच्या निरीक्षणानुसार ही प्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी (१७ मार्च) रात्री उशिरा संवर्धनाचे काम झाले. चार दिवसांच्या काळात अंबाबाईचा गाभारा बंद ठेवण्यात आला होता.

भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पेटी चौकात कलश व उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. तसेच अभिषेकाचीही सुविधा सुरू होती. मूळ मूर्तीच्या संवर्धनामुळे एक दिवस आणखी वाढला. त्यामुळे गेले पाच दिवस भाविकांना कलश दर्शन व उत्सवमूर्तीचे दर्शन घ्यावे लागले. बुधवारी मात्र सकाळी साडेआठ वाजता देवीच्या मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा, अभिषेक व आरती करून दर्शनाला पूर्ववत सुरुवात झाली.

दरम्यान, बुधवारी सकाळी साडेआठ वाजता अंबाबाईच्या गाभा-यातील मूळ मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. धार्मिक विधी झाल्यानंतर दर्शनासाठी गाभारा खुला करण्यात आला.

मंदिरात सध्या पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींची कामे
श्री अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास आराखड्यांतर्गत मंदिरात सध्या पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींची कामे केली जात आहेत. यामध्ये मंदिराच्या मूळ दगडी बांधकामाचे जतन-संवर्धन केले जात आहे. हे बांधकाम अधिक मजबूत करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर केला जात आहे. गाभा-यातील संवर्धनाच्या कामाला शनिवारपासून सुरुवात झाल्याने त्या दिवसापासून अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन चार दिवसांसाठी बंद करण्यात आले होते.

भाविकांना आज गुरुवारपासून चांदीच्या उंब-यापासून देवीचे दर्शन घेता येणार आहे. जतन-संवर्धनाच्या कामामुळे मंदिरातील दगडी भिंतींवरील रंग जाऊन त्याचे मूळ स्वरूप खुलले आहे. शिवाय बांधकाम अधिक मजबूत झाले आहे. विकास आराखडामधून श्री अंबाबाई मंदिर आणि परिसरात जतन-दुरुस्ती काम सुरू असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण मंदिरात हे काम केले जाणार आहे. लवकरच श्री अंबाबाई मंदिरास गतवैभव प्राप्त होईल.
– विलास वाहणे, सह. संचालक पुरातत्व विभाग, पुणे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR