शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
आनादी काळापासून परंपरेनुसार सुरू असलेल्या श्री अनंतपाळ यात्रा महोत्सवच्या निमित्ताने दि.२५ एप्रिल ते दि.२९ एप्रिलपर्यंत संगीतमय बसव कथा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री बैठकी भजन धार्मिक कार्यक्रम व प्रसाद तसेच विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमासह कुस्त्यांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती श्री अनंतपाळ यात्रा महोत्सव कमिटीच्या वतीने देण्यात आली.
शिरुर अनंतपाळ पंचक्रोशीतील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असणा-या ग्रामदैवत श्री अनंतपाळ यात्रा महोत्सवास भव्य संगीतमय बसव कथेने सुरूवात झाली आहे. ९ दिवस चालणा-या या यात्रेत दि.२९ एप्रिल सायंकाळी श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्री भजन होणार आहे. दि.३० एप्रील रोजी खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून यासाठी सिनेतारका प्राजक्ता गायकवाड व माधुरी पवार यांची खास उपस्थिती राहणार आहे. दि. १ मे रोजी महाप्रसाद, दि. २ मे रोजी श्री अनंतपाळ महाराज पालखी पालखी मिरवणूक व त्यानंतर महाप्रसाद तर दि.३ मे रोजी दुपारी श्री अनंतपाळ मंदिराच्या कल्लोळा शेजारी वजनी गटप्रमाणे कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमासह कुस्त्यांचा परिसरातील सर्व भाविक भक्तांसह नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व यात्रा महोत्सवात सहभागी होऊन शोभा वाढवावी,असे आवाहन अॅड. संभाजीराव पाटील, बाळासाहेब पाटील व उमाकांत देवंगरे गुरुजी, किशन इंदलकर गुरुजी, अनिल देवंगरे, रतन शिवणे, अशोक कोरे, विनोद धुमाळे, बालाजी कामगुंडा आदी सदस्यांनी केले आहे.

