लातूर : प्रतिनिधी
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संच मान्यतेचे निकष कोणालाही विश्वासात न घेता, गुप्तपणे बदलण्याच्या धोरणाला व शिक्षक संच मान्यतेत कपात करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि कारणीभूत होणा-या या कृतीचा महासंघ निषेध करीत असून, त्यामुळे सध्या प्रचलित असलेले निकष कायम ठेवावेत. यासाठी संदर्भीय निवेदन लातूर शिक्षण उपसंचालक कार्यालयचे सहाय्यक संचालक संजय पंचगल्ले यांना देण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्राचार्य संजय वाघमारे, प्राचार्य अजय पाटील, प्रा. बाळासाहेब बचाटे, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य एकनाथ पाटील, प्राचार्य प्रशांत घार, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, प्राचार्य जाधव, प्रा. गुणवंत बिराजदार, प्रा. राजेंद्र नागरगोजे आदी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अन्यायकारक संच मान्यतेतील तरतुदीमुळे शिक्षकांच्या संख्येवर कसा विपरीत परिणाम होणार आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे देखील कशा पद्धतीने नुकसान होणार आहे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून त्यासंबंधीचे निवेदन सहाय्यक संचालकांना देण्यात आले.
या निवेदनाच्या माध्यमातून संघ कोणत्याही परिस्थितीत प्रॅक्टिकलची बॅच ही २० विद्यार्थ्यांच्या संख्येवरून ३० विद्यार्थ्यांपर्यंत मान्य करणार नाही, बॅचमधील विद्यार्थी संख्या ही पूर्वीप्रमाणे २० च ठेवण्यात यावी. तसेच राज्यातील विविध विभागात असलेल्या ४० व ४५ मिनिटाच्या तासिका पूर्वीप्रमाणेच जैसे थे ठेवण्यात याव्या, अशी जोरदार मागणी याप्रसंगी विविध शासनादेश व परिपत्रकाचा आधार देऊन करण्यात आली.
















