मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना असा टोकाचा संघर्ष सुरू असतानाच, राजकारणाच्या या रणधुमाळीत एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे एकमेकांसमोर आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची यावेळी भेट घेतली. या दोन्ही कट्टर राजकीय शत्रूंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एकीकडे सभेमागून सभा आणि आरोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. मुंबईत आयोजित एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते निमंत्रित होते. याच कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांची समोरासमोर भेट झाली. केवळ नजरानजर न होता दोघांमध्ये सुमारे एक ते दीड मिनिटे बातचीत देखील झाली.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे यांनी राऊतांच्या आरोग्याबद्दल आस्थेने विचारणा केली, तर राऊत यांनीही त्यांना प्रतिसाद दिला. ही भेट पूर्णपणे अनौपचारिक आणि सौजन्यपूर्ण होती. यापूर्वीही जेव्हा संजय राऊत यांची तब्येत खालावली होती, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

