मुंबई : प्रतिनिधी
विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्याइतकेच वादग्रस्त ठरूनही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम या दोन्ही मंत्र्यांना संभाव्य कारवाईपासून वाचवण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तरी यशस्वी ठरले आहेत. शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच्या दिल्ली भेटीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मंत्र्यांची बाजू मांडून त्यांना अभय मिळवून दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोकाटे यांच्याप्रमाणे मंत्री शिरसाट आणि मंत्री कदम यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विधान परिषदेत मोबाईलवर रमीचा डाव मांडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले होते. त्याचवेळी शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या घरातील खोलीत पैशांनी भरलेल्या कथित बॅगचा व्हीडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला. तर गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे परवाना असलेल्या मुंबईतील बारमध्ये मुली नाचवल्या जात असल्याचे आणि या बारवर पोलिसांनी धाड टाकल्याचे पुरावे समोर आले. त्यामुळे विरोधी पक्षाने वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे शीर्षस्थ नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत फडणवीस यांनी शहा यांना वादग्रस्त मंत्री आणि त्यांच्यावरील आरोपांची माहिती दिली. कोकाटे यांचे मोबाईलवर रमी खेळतानाचे चित्रण समोर आल्यानंतर ही कृती सरकारसाठी भूषणावह नसल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकाटेंबाबतीत पवित्रा घेतला होता. तसेच खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा कोकाटे यांच्यावरील कारवाईसाठी अनुकूल होते. मात्र, धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ कोकाटे यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या दुस-या मंत्र्यांचा बळी जाऊ नये. तसेच शिंदे गटाच्या मंत्र्यांवर कारवाई होणार नसल्याने कोकाटे यांना शेवटची संधी म्हणून त्यांचे खाते बदलण्याचा निर्णय झाला.
एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी
माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पातळीवर झाला. मात्र, शिंदेंच्या वादग्रस्त मंत्र्यांबाबत अशी चर्चा शिंदे गटात झाली नाही. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री योगेश कदम हे सर्वस्वी शिंदेंवर अवलंबून होते. कोकाटे, शिरसाट आणि कदम यांच्यावर एकाचवेळी कारवाई अपेक्षित होती. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीनंतर शिरसाट आणि कदम यांच्यावरील कारवाई मागे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

