मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ साठी संजू सॅमसनचा ट्रेड आता जवळपास निश्चित मानला जात आहे. मागील सीझनपर्यंत संजू राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता, मात्र आयपीएल २०२५ संपताच त्याच्या टीम बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
आता क्रिकबजच्या अहवालानुसार, संजू सॅमसनची चेन्नई सुपर किंग्ज सोबत ट्रेड डील अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते.
अहवालानुसार, संजूच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांचा समावेश असलेला मोठा ट्रेड होऊ शकतो. जर हा करार पूर्ण झाला, तर हा आयपीएल इतिहासातील सर्वांत मोठ्या ट्रेड डीलपैकी एक मानला जाईल. याआधी चर्चा होती की संजूचा दिल्ली कॅपिटल्ससोबत ट्रिस्टन स्टब्सच्या बदल्यात व्यवहार होऊ शकतो, परंतु आता सीएसकेने सॅमसनवर जवळपास शिक्कामोर्तब केले.
माजी कर्णधार आणि दिग्गज विकेटकीपर धोनी आता करिअरच्या अंतिम टप्प्यात आहे. सीएसकेच्या सीईओने नुकतेच सांगितले की धोनी आयपीएल २०२६ मध्ये खेळेल, पण तो किती सामने खेळू शकेल हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. धोनीने अनेक वेळा स्पष्ट केले आहे की फिटनेस साथ देईल तोपर्यंत तो सीएसकेसाठी खेळेल.
अशा परिस्थितीत सीएसकेमध्ये संजू सॅमसन येत असल्यास तो धोनीच्या विकेटकीपिंगच्या भूमिकेची जागा घेणारा प्रमुख पर्याय ठरू शकतो. संजू हा फक्त उत्कृष्ट विकेटकीपर नव्हे तर टॉप ऑर्डरमध्ये आक्रमक खेळ करणारा फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. शिवाय, संजूचा आयपीएलमधील विक्रमसुद्धा प्रभावी राहिला आहे.
जर जडेजाचा समावेश या ट्रेड डीलमध्ये झाला, तर त्याचे राजस्थान रॉयल्समध्ये पुनरागमन होईल. जडेजाने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात २००८ मध्ये राजस्थानसोबतच केली होती आणि त्यावर्षी शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने पहिला आयपीएल किताब जिंकला होता. त्यानंतर जडेजा सीएसकेमध्ये दाखल झाला. आता मात्र, संजू सीएसकेमध्ये प्रथमच खेळताना दिसू शकतो, तर जडेजाची करिअरमधील पहिली टीम असलेल्या राजस्थानमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे. हा ट्रेड अधिकृत होताच आयपीएल जगतात मोठी खळबळ उडण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.

