24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रसंपत्तीसाठी जावयाने केली सास-याची हत्या; मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

संपत्तीसाठी जावयाने केली सास-याची हत्या; मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

भंडारा : प्रतिनिधी
सास-याची संपत्ती मिळावी, या लालसेपोटी जावयानेच सास-याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना भंडा-यात समोर आली आहे. मित्राच्या मदतीने जावयाने ही हत्या केल्याप्रकरणी आता कारधा पोलिसांनी आरोपी जावई आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. ही निर्घृण हत्या भंडा-याच्या कोकणागड येथे घडली. किशोर कंगाले (६०) असे मृत सास-याचे नाव आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीमध्ये जावई अमित लांजेवार (३६) आणि त्याचा मित्र योगेश पाठक (२६) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत किशोर कंगाले हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांना एकुलती एक मुलगी असून तिने अमित लांजेवार याच्यासोबत आंतरजातीय विवाह केला आहे. या विवाहाला सुरुवातीपासूनच मृत किशोर कंगाले यांचा विरोध होता. त्यामुळे मृतक हे कोकणागड येथे राहून शेती सांभाळत होते.

मुलीच्या आंतरजातीय विवाहामुळे मुलगी आणि जावयाला संपत्ती आणि त्यांची कुठलीही मालमत्ता देणार नाही, असा संशय जावयाला निर्माण झाला होता. याच वादातून जावयाने सास-याची हत्या करून त्यांचा मृतदेह शेतशिवारातील पुलाखालील पाईपमध्ये दडवून ठेवला.

किशोर कंगाले हे घरात दिसून आले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीनुसार, तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासाचा धागा किशोर कंगाले यांच्या जावयापर्यंत येऊन थांबला असता, पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांनी जावई अमित लांजेवारला नागपुरातून तर त्याचा मित्र योगेश पाठकला रामटेकमधून अटक केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR