मुंबई : केंद्रीय गृहसचिवांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट युनियनने ट्रक आणि टँकरचालकांना त्यांचा देशभरातला संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. हिट अँड रन प्रकरणातल्या कायद्यात नव्या तरतुदी तूर्तास लागू होणार नाहीत, असे आश्वासन केंद्रीय गृह खात्याकडून देण्यात आले आहे. त्यामुळे ट्रकमालकांच्या संघटनेकडून ट्रक आणि टँकरचालकांना संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण काही ठिकाणी इंधन पुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे.
दरम्यान, मुंबईत आज बुधवारी पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली आहे. ट्रान्सपोर्ट युनियनने जरी आपला संप मागे घेतला असला तरी मुंबईत काही ठिकाणी काल दिवसभर लोकांमध्ये गैरसमज पसरल्यामुळे पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या दिसल्या. काही ठिकाणी साठा संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहेत तर काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर आज साठा आहे. मात्र पहाटेपासूनच आजही मुंबईकरांनी डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्या आहेत.
नागपुरात परिस्थिती काय?
नागपूर शहरातील ७५ टक्के पेट्रोल पंप कोरडेठाक झाले आहेत आणि आज रात्रीपर्यंत उर्वरित २५ टक्के पेट्रोल पंपही कोरडे होण्याची भीती आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी माहिती दिली. तर दुसरीकडे प्रशासनाकडून पोलिस सुरक्षेत पेट्रोल टँकर्स डेपोमधून आवश्यक ठिकाणी पाठवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
इंधन असेपर्यंत सेवा देणार : महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची भूमिका
मालवाहतूकदारांनी संप जरी मागे घेतला असला तरी सलग दोन दिवसांच्या संपामुळे राज्यात अनेक भागात इंधनाचा तुटवडा आहे. संपाला पाठिंबा नसला तरी इंधन असेपर्यंत सेवा देणार अशी भूमिका स्कूल बस असोसिएशनने घेतली आहे. हिट अँड रन कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा नाही किंवा त्यात सहभागी झालेलो नाहीत. स्कूल बसेसना जोपर्यंत डिझेल मिळेल तोपर्यंत बस रस्त्यावर धावतील आणि सेवा देतील, अशी माहिती महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे. मुंबईत एकूण सहा हजार ते महाराष्ट्रात ४० हजार स्कूल बसेस आहेत.
भाज्यांची आवक घटली
वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम बाजार समितीवर झाला आहे. भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. महाराष्ट्रात ४०० ते ४२५ गाड्यांची आवक होते, मात्र संपामुळे दोन दिवस १०० ते १५० गाड्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाला दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे.