लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील मुरूड येथील समाज जागृती शिक्षण संस्थेच्या संभाजी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमाच्या उन्हाळी परीक्षा २०२६ अत्यंत सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात सुरू आहेत. विद्यापीठाच्या अधिकृत भरारी पथकाने नुकतीच या परीक्षा केंद्राला भेट दिली असता, येथील शिस्तबद्ध नियोजनाचे आणि भयमुक्त वातावरणाचे भरभरून कौतुक केले आहे. हे परीक्षा केंद्र पूर्णपणे ‘कॉपीमुक्त’ ठेवण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया महाविद्यालयातील अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमे-यांच्या थेट निगराणीखाली पार पडत आहे.
मुक्त विद्यापीठाच्या या परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष बी. एस. पठाडे व सचिव अॅड. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा यंत्रणा कार्यरत आहे. यामध्ये केंद्रप्रमुख तथा प्राचार्य डॉ. अशोक काळम, केंद्र संयोजक डॉ. मारुती बिडवे, केंद्र सहाय्यक भरतेश मांडवकर, विद्यापीठाचे अंतर्गत वरिष्ठ व बहि:स्थ पर्यवेक्षक डॉ. गोविंद उफाडे आणि शिक्षकेतर कर्मचारी बंकट घुटे हे सर्वजण अत्यंत सतर्क राहून चोख कर्तव्य बजावत आहेत. परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण टीम सातत्याने प्रयत्नशील आहे. महाविद्यालयाच्या या चोख व्यवस्थेबद्दल विद्यापीठ स्तरावरून समाधान व्यक्त होत आहे.
















