महिला डॉक्टर आत्महत्या, बदनेही फलटण पोलिस ठाण्यात
फलटण : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी शारीरिक व मानसिक छळ करणारा पीडितेचा घरमालक प्रशांत बनकर याला पुण्यातून त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवरून शनिवारी पहाटे अटक केली. दरम्यान, चारवेळा बलात्कार केल्याचा आरोप असलेला मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने शनिवारी रात्री उशिरा फलटण शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यातच संशयित आरोपी प्रशांत बनकर याला कोर्टात हजर केले असता त्याला ४ दिवसांची म्हणजेच २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
फलटण येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात सरकारी वकील महाले यांनी प्रशांत बनकरला ७ दिवसांची पोलिस कस्टडी मागितली तर आरोपी प्रशांत बनकरचे वकील सुनील भोंगळे यांनी संशयित आरोपी प्रशांत बनकरला कमीत कमी पोलिस कस्टडी द्यावी, असा युक्तिवाद केला. यावर न्यायालयाने ४ दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली. सहदिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
तत्पूर्वी संशयित आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. घटनेनंतर पोलिसांची पथके दोन आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती. युवतीने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकरने मानसिक व शारीरिक छळ केल्याचा उल्लेख केला आहे.
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय बदने याचे काल शेवटचे लोकेशन पंढरपूर होते. तोही बीड परिसरातील असल्याने साता-यावरून बीडकडे जाताना त्याने बहुदा पंढरपूर परिसरात फोन बंद केलेला असावा, असे सांगितले जात होते. परंतु शनिवारी रात्री तो फलटण शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. आता पोलिस त्याची चौकशी करीत आहेत.
प्रशांत बनकर मुख्य आरोपी?
मृत डॉक्टर तरुणीच्या चुलत्याने प्रशांत बनकर हा मुख्य आरोपी असल्याचा आरोप केला आहे. प्रशांत बनकर याला फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पीएसआय बदने
पोलिस ठाण्यात हजर!
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. कालपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र, तो पंढरपूरमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, बदने स्वत: शनिवारी रात्री फलटण शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. आता त्याला उद्या कोर्टात हजर केले जाऊ शकते.
















