28 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeमहाराष्ट्रसगळ्यांसाठी झटणारा नेता गेला

सगळ्यांसाठी झटणारा नेता गेला

खासदार शाहू छत्रपती यांची श्रध्दांजली

कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. यात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. अजित पवारांच्या निधनाची माहिती मिळताच मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. तर कोल्हापुरातील नेत्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, अजित पवारांचे आणि आमचे जवळजवळ ३० वर्षांचे संबंध होते. एक बहुजन समाजाचे महत्त्वाचे नेतृत्व म्हणून ते पुढे आले होते. गेल्या काही वर्षांत जरी त्यांचे आणि शरद पवारांचे काही मतभेद होते, मात्र ते वैचारिक मतभेद होते. ख-या अर्थाने ते सगळे एकच आहेत. सगळ्यांसाठी झटणारा एक महाराष्ट्राचा महत्त्वाचा नेता होता. अर्थव्यवस्थेचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. अशी व्यक्ती गेल्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. ते रोखठोक नेते होतेच, कुठलीही गोष्ट ते स्पष्टपणे बोलायचे. एके दिवशी त्यांचा मला भेटायला येणार असल्याचा रात्री फोन आला होता. सकाळी ९ वाजता ते येणार होते मात्र सव्वा आठलाच ते आले होते.

एका कर्तृत्ववान नेतृत्वाला राज्य मुकले – सतेज पाटील
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असल्याचे सांगत अजित दादांबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नाहीत. एका कर्तृत्ववान नेतृत्वाला राज्य मुकले आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र पोरका झाला – धनंजय महाडिक
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी टीव्हीवर पाहिली. यानंतर देवाकडे प्रार्थना करत होतो यानंतर दुसरी काही बातमी येऊ नये. पण विमानाची दृश्यं दाखवली त्यावेळी छातीतील धडधड वाढली अन् काही क्षणात जी बातमी ऐकायला नको होती ती समोर आली. अजितदादा निघून गेल्याने महाराष्ट्र पोरका झाला. अतिशय स्पष्टवक्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करणा-या दादांविषयी स्वप्नात देखील वाटले नव्हते. महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून निघणारी नसल्याच्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

उमदा नेता गमावला – राजू शेट्टी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन झाल्याचे ऐकले अन् मन सुन्न झाल्याची प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्राने उमदा, दिलदार, मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा नेता गमावला. राजकारण, समाजकारण, सहकार अन् राज्याच्या आर्थिक स्थितीची खडान्खडा माहिती असणारे एक अभ्यासू असे नेतृत्व महाराष्ट्राने गमावले. गेल्या दोन दशकांमध्ये राज्याच्या राजकारणात अजितदादांचा प्रभाव होता. शेतक-यांच्या प्रश्नावर अनेकदा टीका-टिपण्णी होऊन सुद्धा व्यक्तिगत स्नेह कायम होता. दिलदार मनाच्या अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र हादरला असल्याचे मत व्यक्त करत शेट्टींनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.

हा अतिशय मोठा धक्का – संजय मंडलिक
माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, हा अतिशय मोठा धक्का मला आणि महाराष्ट्रातल्या सर्व तरुण राजकारणी मंडळींना आहे. त्यांचा आदर्श घेऊन अनेक मंडळी राजकारणात काम करत आहेत. विशेषत: कोल्हापूरशी देखील त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. अनेकवेळा भेटल्यानंतर ते कोल्हापूरच्या आठवणी सांगायचे. अशा नेत्याला राज्याने गमावल्यामुळे सर्वच पक्षांतील नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. हे कधीही न भरून निघणारे नुकसान असल्याचे मत व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

मतभेद होते पण आदर कायम…
; अजित पवारांच्या निधनाने प्रियंका चतुर्वेदींना अश्रू अनावर
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी अजित पवार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक, वेदनादायी आणि हृदयद्रावक आहे असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. राजकीय पातळीवर आमच्यात मतभेद असले तरी आदर कायम होता, आम्ही एकत्र काम केलं आहे. अजित पवार हे कामाप्रती पूर्णपणे समर्पित असलेले नेते होते, अशा शब्दांत त्यांनी पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रियंका यांना अश्रू अनावर झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR