मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे वरळीतील खंदे शिलेदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटातून उपसभापतीपदाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सचिन अहिर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या धक्कादायक राजकीय घडामोडीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ आणखी घटले असून, आता ठाकरे गटाकडे केवळ ५ आमदार उरले आहेत. अनिल परब , मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे , ज. मो. अभ्यंकर , सुनील शिंदे
ऐन निवडणुकीच्या दिवशीच धक्कातंत्र
सभापती राम शिंदे यांनी काल (२९ जून) सभागृहात उपसभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, १ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता ही निवडणूक होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. शिवसेना शिंदे गटाकडून चक्क ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. सचिन अहिर अर्ज भरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गो-हे आणि मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.
वरळी मतदारसंघात ठाकरेंना मोठा फटका
सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत जाण्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघात मोठा फटका बसला आहे. वरळी मतदारसंघात ठाकरे गटाचे दोन आमदार होते, ज्यातील एक सचिन अहिर होते. खासदार संजय दिना पाटील यांच्या पक्षात वाढत्या प्रभावामुळे सचिन अहिर नाराज होते आणि मागील काही दिवसांपासून ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे शिवसेनेकडून त्यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची संधी देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. सचिन अहिर यांच्याकडे कामगार संघटनांची मोठी ताकद असून, पक्ष संघटनेतही त्यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांचा हा प्रवेश ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकवणारा ठरला आहे.
















