मुंबई : देशातील नामवंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. न्यायालयाने सचिन वाझेच्या जामीन अर्जावरील सुनावणी स्थगित केली असून पुढील सुनावणी ७ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे सचिन वाझेचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे.
सुनावणीदरम्यान एनआयएच्या वतीने अॅड. अनिल सिंग यांनी बाजू मांडली. सचिन वाझे याच्यावर गंभीर स्वरूपाचे दहशतवादी कृत्य आणि हत्येचे गंभीर आरोप आहेत, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. तसेच, ज्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली होती, त्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेशी संबंधित ३ सुरक्षा अधिका-यांचे जबाब नोंदवण्यात आले असल्याचेही एनआयएतर्फे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.
सचिन वाझेंच्या जामिनाविरोधात ‘एनआयए’ची धावपळ सुरू आहे. सचिन वाझेंच्या जामिनाविरोधात एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. विशेष एनआयए न्यायालयाने दिलेल्या जामीन आदेशाला स्थगिती देण्याची मागणी ‘एनआयए’ने केली. याचिकेवर सुरुवातीला न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी अपेक्षित होती; मात्र त्यांनी प्रकरणातून स्वत:ला बाजूला करत सुनावणीस नकार दिला. त्यानंतर प्रकरण न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवण्यात आले.
















