16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeलातूरसत्ताधा-यांच्या भ्रष्ट कारभारामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय

सत्ताधा-यांच्या भ्रष्ट कारभारामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर नगरपंचायतीतील प्रलंबित विकासकामे, त्यासाठी आलेल्या निधीचा अपव्यय, भ्रष्टाचार आणि निवडणूक प्रक्रियेत भाजपकडून होत असलेल्या दबाव तंत्रांविरोधात शनिवारी (दि. २९ ) माजी आमदार  धिरज विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली व  विकास कामात झालेल्या नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभारावर  थेट सवाल उपस्थित करून निवडणुक काळात भाजपकडून होत असलेल्या डावपेचांवर जोरदार प्रहार करून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे घर सरकारी जमिनीवर असल्याचा गंभीर आरोप ही माजी आमदार देशमुख यांनी केला.
      माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी शनिवारी (दि.२९ ) भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे घर सरकारी जमिनीवर असून हे प्रकरण शासकीय यंत्रणेला गोंधळात टाकून, त्यांच्यावर दबाव आणून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे. नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निवडणुक आयोगाने वारंवार बदलाची भूमिका घेतली असून निवडणुका पारदर्शक व निष्पक्ष व्हाव्यात यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे, मात्र भाजप दबाव तंत्राचा वापर करत आहे, रेणापूर नगरपंचायत भाजपच्या हातातून जाणार हे त्यांना जाणवत आहे. म्हणूनच ते कटकारस्थान, अफवा व दिशाभूल करण्याचे प्रयत्न करीत आहेत, रेणापूरच्या विकासासाठी भाजपकडून ११२ कोटींचा निधी आणल्याचा दावा करण्यात आला.
तो निधी कोठे वापरला याबाबत माहिती अधिकारातून काही लोकांनी माहिती घेतली असता हा पैसा कुठे खर्च झाला याचे स्पष्टीकरण त्यांना मिळत नाही.जनतेला फक्त बॅनरबाजी आणि फुशारक्या दाखवण्यात आल्या. काम मात्र शून्य अशी टिका माजी आमदार धिरज देशमुख यांनी केली. सार्वजनिक शौचालय, पाणी, स्वच्छता व अर्धवट कामांवर लाखो खर्च करून जनतेची फसवणूक केली असून विंधन विहीर, वॉकिंग ट्रॅकसाठीचा निधी, नगरपंचायत इमारत बांधकाम, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, घंटा गाड्या यासाठी ८६ लाखांची तरतूद करूनही शहरात स्वच्छता नावाची गोष्ट नाही. प्रत्येक गल्लीमधून मोकाट जनावरांचे साम्राज्य दिसून येते, शादीखान्यासाठी मंजूर केलेले दोन कोटी , त्याचे झालेले दोन वेळा उद्घाटन, रेणा नदी घाटासाठीचा तीन कोटींचा निधी, यावर शंका उपस्थित करून बॅनरबाजी व केवळ सोशल मीडियावर घोषणाबाजी केली जात आहे असा गंभीर आरोप देशमुख यांनी केला.
     तसेच २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारने ८ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती.जनतेच्या हक्काची कामे भाजपने अडवली. केवळ आकसापोटी विकास रोखला असे सांगून नदीघाट, शादीखाना, महात्मा गांधी पुतळा अशी अनेक विकास कामे मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात आली, असा आरोप करून भाजपच्या अपयशी कारभाराला आता जनता कंटाळली आहे. रेणापूरच्या विकासासाठी जनता काँग्रेससोबत उभी आहे. आगामी नगरपंचायतची निवडणूक ही परिवर्तनाची होईल यात शंका नाही. असे माजी आमदार धिरज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, अ‍ॅड. किरण जाधव, माजी जि. प. अध्यक्ष संतोष देशमुख, पक्ष निरीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना प्रदिप माने व १७ प्रभागातील  नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR