मुंबई : महाविकास आघाडी आणि मनसे तसेच इतर विरोधी पक्षांच्या सत्याच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने मुंबईत मूक आंदोलन सुरू केले आहे. मतदार याद्यांमधील घोळाविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले असून वेगवेगळ्या माध्यमांतून ते दुबार मतदारांची नावे समोर आणत आहेत.
१ नोव्हेंबर रोजी मविआ सहित मनसेने सत्याचा मोर्चा काढण्याची घोषणा केली आणि तयारी सुरू केली. त्यानंतर या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने मूक आंदोलन केले. यावेळी भाजप आमदार आणि नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत याच लोकांनी संविधान बदलणार असे फेक नॅरेटिव्ह सेट केले होते. या फेक नॅरेटिव्हच्या या महाभकास आघाडीच्या लोकांनी लोकसभेत मते मिळवली. मात्र, विधानसभा निवडणुकीत लोकांना ही चोर मंडळी असल्याचे कळले आणि त्यांनी महाभकास आघाडीचा पराभव केला, अशी जोरदार टीका चित्रा वाघ यांनी केली. भाजपच्या मूक आंदोलनात चित्रा वाघ भाडभाड बोलल्या आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आताही ही मंडळी फेक नॅरेटिव्ह सेट करत आहेत. मात्र, जनता सुज्ञ आहे. भाषणाला आणि टोमण्यांना नाही तर विकासाला प्राधान्य आहे. त्यामुळे विकासासाठी महायुतीची कास धरली पाहिजे, हे जनतेला ठाऊक आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
आजचा महाविकास आघाडी, मनसे आणि विरोधकांचा सत्याचा मोर्चा ही नौटंकी आहे. आता या मंडळींनी कितीही नौटंकी केली तरी उपयोग नाही. त्यांची आताची नौटंकी म्हणजे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणा-या पराभवाची पार्श्वभूमी तयार करत आहेत. या निवडणुकीत त्यांची माती होणार आहे, अशी जहरी टीका चित्रा वाघ यांनी केली. सध्या जनता महायुतीसोबत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे, असा दावाही त्यांनी केला.

