20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रसदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊत यांच्यावर अभद्र शब्दांत टीका

सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊत यांच्यावर अभद्र शब्दांत टीका

मुंबई : प्रतिनिधी
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. शरद पवारांवरील टीकेवरून सुरू झालेला वाद थांबला नसतानाच सदाभाऊ खोत यांनी पुन्हा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर अभद्र शब्दांत टीका केली आहे. २४ तासांत दोन वादग्रस्त विधाने केल्यामुळे सदाभाऊ खोत आता पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांचे आजारपण आणि शारीरिक व्यंगावर टीका केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर वाद निर्माण झाला. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर बोलताना ‘देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा’ असा उल्लेख केला.
त्याला उत्तर देताना सदाभाऊ खोत म्हणाले की, संजय राऊत यांना गावगाडा माहिती नाही. शेतक-याचा राखणदार कुत्रा. त्यांना इतकंच सांगेन की कुत्रा हा इमानेइतबारे त्याच्या धन्याची राखण करत असते. तो खाल्लेल्या अन्नाला जागत असतो. तसेच, आम्ही आमच्या धन्याची इमानेइतबारे राखण करत आहोत, याचा सार्थ अभिमान आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, २०१४ मध्ये मोदींचा फोटो गळ्यात अडकवून मतांचा जोगवा मागत गावोगावी हिंडत होता. २०१९ मध्येही तुम्ही भाषणं करत होता. सत्तेत येताच पहिला खंजीर हातात घेतला. तुमच्यात इमानदारपणा आहे का शोधा, कुत्र्याएवढा जरी तुमच्यात इमानदारपणा असता तरीसुद्धा महाराष्ट्राने कौतुक केलं असतं. परंतु मला त्यांच्यावर जास्त बोलावं असं वाटत नाही. कारण, डुकराला कितीही साबण, शाम्पू लावला तरी डुक्कर गटारातच जात असतं, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. आता या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR