अहमदपूर : प्रतिनिधी
समाजाला आज ज्ञानाच्या मंदिराची खुपच गरज असून तालुक्यातील कुमठा येथील शाळा ही खूपच उत्कृष्ट, विकासीत झालेली आहे. अशाच पद्धतीने सर्वच जिल्हा परिषद शाळांचा विकास झाला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी कुमठा बुद्रुक येथे केले.
कुमठा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत बालकिशन कदम व मारुती ढेले या दोन शिक्षकांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे हे होते. विचारपीठावर गटविकास अधिकारी पंकज शेळके, बळीराम भिंगोले, पंचायत समिती सदस्य कृष्णा भोसले, निवृत्तीराव कांबळे, बाबुराव पाटील, करीम सौदागर, वसंत जाधव, डॉ. अरुण मरवाले, चांदपाशा चौधरी, विजय पवार, शैलेंद्र बायस, केंद्रे, मुरली बिराजदार, ग्यानोबा शेवाळे, रवींद्र भंडे, अतुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, विद्यार्थी घडविण्याचे काम हे शिक्षक करीत असतात, त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात काम करीत असताना प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. शिक्षण क्षेत्रात एआय क्रांतीमुळे बदल घडू शकतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ए आय क्रांतीचा अनुभव शिक्षकांनी दिला पाहिजे, असे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

