23.2 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeलातूरसमान वागणूक, समान न्याय, समान अधिकार हा काँग्रेसचा विचार

समान वागणूक, समान न्याय, समान अधिकार हा काँग्रेसचा विचार

लातूर : प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीत लातूरच्या जनतेने खासदार निवडून दिला मात्र तत्पूर्वी माजी खासदार सुधाकर शृंगारे यांना त्यांच्या पक्षाने लोकांपर्यंत पोहोचू दिले नाही. केवळ शिफारस पत्रे लिहून घेतली. आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करुत आहेत. कारण काँग्रेसमध्ये नेहमीच  समान वागणूक, समान न्याय आणि अधिकार या विचारांना सर्वोच्च महत्त्व असल्याचे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी धिरज देशमुख यांनी लातूर तालुक्यातील निवळी, काळे बोरगाव, शिराळा, पिंपरी अंबा या गावांना भेट देत संवाद बैठका घेतल्या त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी खासदार सुधाकर शृंगारे, लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, राजेसाहेब सवई, अनुप शेळके आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार धिरज देशमुख म्हणाले की, सध्याचे वातावरण पाहता महाविकास आघाडीला विजयाचा गुलाल लागल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातील जनतेने ३ वेळा काँग्रेस आमदार निवडून दिला आहे. आता विजयाचा चौकार मारायचा आहे आणि या निवडणुकीत जे विरोधक पुन्हा एकदा नशीब अजमावत आहेत त्यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक करत आपल्याला विजय मिळवायचा असल्याचा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला.
आमदार धिरज देशमुख यांनी पुढे बोलताना सांगितले की, लोकनेते विलासराव देशमुख यांनी निवळीच्या माळरानावर कारखाना उभा करून उसाच्या गाळपाचे काम सुरू केले. शेतक-यांना उसाचा चांगला दर मिळेल, रोजगारनिर्मिती केली जाईल ही आश्वासने आज पूर्ण झाली आहेत.  काँग्रेसने कारखाने व बँकांच्या माध्यमातून शेतक-यांना मदत केली आहे. आता आगामी काळात महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर बेरोजगारांना ४ हजार रुपये आणि महिलांना महालक्ष्मी योजनेतून ३ हजार रुपये मिळणार आहेत, असे त्यांनी जाहीर केले. शेतक-यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असून ‘काँग्रेस है तो देश सेफ है’ या शब्दांत त्यांनी विश्वास व्यक्त केला.
आमदार धिरज देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, विरोधात असताना सोयाबीनला ६ हजार रुपये भाव मागणारे सत्तेत असताना भाव देत नाहीत त्यामुळे अशा सरकारला मतदान मागण्याचा अधिकार नाही. खोटी आश्वासने देऊन, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या जागी त्यांनी अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीची वाढ केली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या वेळी देशमुख यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर भर देत, शेतकरी आणि कामगारांसाठी काँग्रेस नेहमीच लढत राहील, असा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR