मुंबईत ठाकरेंचा बॉम्ब, शिंदेंच्या पोटात गोळा!, नगरसेवक सुरक्षितस्थळी
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. परंतु तिन्ही पक्षांनी जोर लावूनही त्यांना काठावरच बहुमत मिळविता आले. कारण ठाकरे बंधूंनी जोर लावल्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुस-या क्रमांकाचा पक्ष बनला तर शिंदे सेना तिस-या क्रमांकावर फेकली गेली. त्यामुळे महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वी समीकरणे जुळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल, असे म्हणत निवडणूक निकालाच्या दुस-याच दिवशी बॉम्बगोळा टाकला. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला बहुमत मिळाल्याने महायुतीचाच महापौर होईल, असे सांगतानाच आमचा कोणीही शत्रू नाही, जे सोबत येतील, त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ, असे वक्तव्य केल्याने शिंदेंच्या पोटात गोळा उठला आहे.
निवडणूक निकालानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपण अपेक्षित यश मिळवू शकलो नाही. आपला महापौर झाला पाहिजे, हे स्वप्न होते. देवाच्या मनात असेल तर तेही घडेल, असे सूचक वक्तव्य करीत गोंधळ उडवून दिला. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदेंच्या शिवसेनेला निसटते बहुमत मिळाले आहे. काही गडबड होऊ नये, यासाठी शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. या पार्श्वभूमीवर देवाच्या मनात असेल तर अजूनही आपला महापौर होऊ शकतो, असे सांगून गोंधळ उडवून दिला. हा ‘देवा’ म्हणजे ईश्वर की देवाभाऊ ऊर्फ देवेंद्र फडणवीस? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यावरून उलटसुलट चर्चा रंगली.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले असून, आपले सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला २९ जागा मिळाल्या. त्यांच्याही काही जागा अगदी थोड्या मतांनी पराभूत झाल्या; पण भाजपा आणि शिवसेनेचा विचार केला तर पूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे आणि महायुतीचाच महापौर होईल. गेल्या ३ निवडणुकांत कोणत्याच पक्षाला ८५ पेक्षा अधिक जागा मिळाल्या नव्हत्या. भाषेच्या, जातीच्या पलीकडे जाऊन सर्व समाज भाजपासोबत उभा राहिला. मुंबईच्या झोपडपट्टीत, चाळीत, बिल्डिंगमध्ये आपण निवडून आलो. टीम मुंबई, टीम भाजपाचा हा विजय आहे. त्यामुळे मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल, असे म्हटले.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचे ८९ व शिवसेनेचे २९ असे ११८ नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी त्यांना ११४ संख्याबळ हवे असल्याने पुरेशी संख्या आहे. शिवाय अजित पवारांच्या ३ नगरसेवकांची त्यांनाच मदत होऊ शकेल. परंतु फोडाफोडीची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना सुरक्षितस्थळी ठेवले आहे. उद्धव व राज ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचे मिळून ७२ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांची बेरीज ९६ होते. एमआयएम व समाजवादी पार्टीचे १० नगरसेवक आहेत. त्यांच्या मदतीने संख्याबळ १०६ पर्यंत नेता येईल. या स्थितीत ८ नगरसेवक फोडून गडबड केली जाण्याचा धोका लक्षात घेऊन शिंदेंनी खबरदारी घेतली आहे.
आमचा कोणीही शत्रू नाही
निवडणुका आता संपल्या. आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील ते वैचारिक विरोधक आहेत. जे मुंबई विकासाच्या अजेंड्याला साथ देतील त्यांना सोबत घेऊ अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ. मुंबई आता थांबणार नाही, असेही ते म्हणाले.
शिंदेंना नगरसेवक
फुटण्याची भीती?
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला निसटते बहुमत मिळाले आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना प्रलोभन दाखवून फोडाफोडीचे प्रयत्न होऊ नयेत, यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लॅन्ड्स एंड या पंचतारांकित हॉटेलात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून ही काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु शिंदे सेनेचे नगरसेवक नेमके कोण फोडू पाहतेय, याची वाच्यता झालेली नाही. त्यामुळे भाजप की ठाकरे गटाची भीती आहे, याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
फोडणा-यांनाच आपले
लोक फुटण्याची भीती
शिंदे गटाचे निवडून आलेल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याबद्दल उद्धव ठाकरे यांना विचारताच आता फोडणा-यांना आपले लोक फुटण्याची भीती आहे, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. त्यांचा विजय डागाळलेला आहे, ज्यांची मदत घेऊन महापौर बसत आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे. गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे, आपण काय करतोय, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

