नाशिक : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर भयंकर अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कारचे टायर फुटल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. ही घटना नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथे समृद्धी महामार्गावर घडली. अपघातामध्ये जखमी झालेल्यांमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. अपघातातील मृत आणि जखमी हे कल्याणमध्ये राहणारे आहेत. अपघातापूर्वीचा त्यांचा व्हीडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा येथे राहणारे ११ जण कारने लग्नासाठी गेले होते. समृद्धी महामार्गावरून हे सर्वजण जात होते. त्याचवेळी सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवाराजवळ त्यांच्या कारचे टायर फुटले. कारचा वेग त्यातच टायर फुटल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला उलटली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील तिघांनी जागीच प्राण सोडले. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक गावक-यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
या अपघातामध्ये निलेश बुकाणे, त्यांची सख्खी बहीण वैशाली सचिन घुसळे आणि बायको छाया बुकाणे यांचा मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये सचिन घुसळे (४० वर्षे), साची सचिन घुसळे (९ वर्षे), अर्णव निलेश बुकाणे (१४ वर्षे), गोल्डी निलेश बुकाणे (१० वर्षे), सुयश घुसळे (३ वर्षे), निरव गायकवाड (१० वर्षे), मनस्वी गायकवाड (५ वर्षे) हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. तर कारचा चालक प्रशांत शिरसाट (३२ वर्षे) हा देखील किरकोळ जखमी झाला आहे.

