वाशिम : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर भिवंडी इथून कोलकत्ताकडं जाणा-या एका ट्रकमधून २ कोटी ४३ लाख रुपयांच्या औषधी चोरीची घटना २३ जुलैला घडली. याप्रकरणी ३१ जुलैला कारंजा ग्रामीण पोलिसात तीन अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा शोध घेण्यासाठी २५ अधिका-यांची पाच पथकं तैनात करण्यात आली आहेत.
एमएच ०४ जेके ७०५४ क्रमांकाचा कार्गो ट्रक ४ कोटी ५८ लाख रुपये किमतीच्या व्हॅक्सिन भिवंडी इथून समृद्धी महामार्गानं नागपूर-रायपूर मार्गे कोलकाता इथं घेऊन जात होता. २३ जुलै रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान डोणगाव पेट्रोल पंप ते कारंजा हद्दीतील पेट्रोल पंपादरम्यान या ट्रकमधील २ कोटी ४३ लाख ८७ हजार ६८४ रुपये किमतीची व्हॅक्सिन लंपास झाल्याचे चालकाच्या निर्दशनास आहे.
त्यामुळे त्यानं तत्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. तक्रारदार मनोज कुमार शर्मा यांच्या तक्रारीवरुन याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे करीत आहेत.

