मुंबई : प्रतिनिधी
जनतेला पेट्रोल-डिझेल कमी वापरा म्हणून उपदेश करणा-या सरकारने, तेल कंपन्यांना निर्यात कमी करा, असे सांगायची हिंमत का दाखवली नाही? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, १ लाख ३२ हजार कोटींचे कच्चे तेल आयात करायचे, त्यातील ५२ हजार ८७६ कोटींचे तेल परदेशात विकायचे आणि मग देशातील नागरिकांच्या खिशातून महाग पेट्रोल-डिझेलच्या नावाखाली पैसे वसूल करायचे. म्हणजे नफा कंपन्यांचा आणि लूट सामान्य माणसाची. भारतीय जनता पार्टी सरकारला जनतेच्या खिशाची नाही तर उद्योगपतींच्या तिजोरीची जास्त काळजी आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले, असे म्हणत भाजपवर टीका केली आहे.
सरकार मोजक्या लोकांसाठी काम करते
विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्वत:च्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी देशभक्तीच्या घोषणा दिल्या जातात आणि दुस-या बाजूला सामान्य माणसाला अक्षरश: पिळले जाते.जनतेला गाडी कमी चालवा सांगणा-यांनी आधी कंपन्यांचा लोभ कमी करावा. नाहीतर हे सरकार जनतेसाठी नसून काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी चालतंय, हा संशय आता विश्वासात बदलायला वेळ लागणार नाही, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे.
















