मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना (उबाठा) आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. शालेय मुलांसाठी असलेला सरकारी तांदूळ आफ्रिकेत पाठवला जात आहे. या प्रकरणी दानवे यांनी सरकारला थेट ‘भ्रष्टाचार पे चर्चा’ करण्याचे आव्हान दिले आहे. एवढेच नाही तर जागा आणि वेळ सरकारनेच ठरवावी, असे ठणकावून सांगितले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिका-यांना महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात सर्वत्र आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अंबादास दानवे यांनी शालेय पोषण आहार योजनेतील तांदूळ गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. दानवे यांनी जे. व्ही. ग्रेन्स डीलर्स नावाच्या नोंदणीकृत संस्थेच्या अनिलकुमार गुप्ता यांच्यावर हा तांदूळ आफ्रिकेत निर्यात केल्याचा आरोप केला आहे.
शालेय मुलांना पोषण आहार योजनेअंतर्गत पुरवला जाणारा तांदूळ हा मुलांच्या पोषणासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, दानवे यांच्या मते, हा तांदूळ गैरमार्गाने परदेशात, विशेषत: आफ्रिकेत पाठवला जात आहे. या गैरव्यवहारामुळे शालेय मुलांचा घास हिरावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
जे. व्ही. ग्रेन्स डीलर्स ही नोंदणीकृत संस्था सामाजिक कार्यासाठी नोंदवली गेली. पण पहा, या संस्थेला मुंबई जिल्ह्यातील तांदूळ वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले. या संस्थेचे अनिलकुमार गुप्ता यांची संस्थेबाबत वृत्ती ‘वरून सज्जन, आतून चोर’ अशीच आहे. संस्थेला होणारा नफा सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याऐवजी तो हे महाशय स्वत:च्या फायद्यासाठी वापरत असल्याचे समोर आले आहे. हे ऑडिटच्या शेअर होल्डिंगच्या नमुन्यातून सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट झाले आहे.

