15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeमहाराष्ट्रसर्वधर्म समभाव म्हणजे ढोंगीपणा; संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

सर्वधर्म समभाव म्हणजे ढोंगीपणा; संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

नाशिक : प्रतिनिधी
स्वातंत्र्यावेळी तिरंगा झेंडा आपण स्वीकारला. तिरंगा आणि संविधान आपण मानलेच पाहिजे. पण भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचं प्रतीक आहे. त्यामुळे देव, देश आणि धर्मासाठी कटिबद्ध राहा. १५ ऑगस्टला तिरंगा फडकवूच. पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू. सर्वधर्म समभाव मानणे म्हणजे केवळ ढोंगीपणा आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले आहे. ते सध्या नाशिक दौ-यावर आहेत.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने सोमवारी आयोजित व्याख्यानात ‘भारतीय स्वातंत्र्य आणि आपण व हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन’ या विषयावर संभाजी भिडे बोलत होते. त्यावेळी बोलताना भिडे म्हणाले, सर्वधर्म समभाव म्हणजे भारत मातेच्या पोरांनी भारत मातेच्या भवितव्याशी केलेली प्रतारणाच असते, असे सांगत सर्वधर्म समभाव मानणे म्हणजे केवळ ढोंगीपणा आहे. आंबा खाल्ल्याने मुले होतात या वाक्याचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. भिडे म्हणाले की, आपले हिंदू राष्ट्र आहे.

आपल्या अंत:करणात देशभक्ती ठेवून हिंदू राष्ट्रासाठी आपण जगले पाहिजे. देव, देश, धर्म यासाठी लढले पाहिजे. देशाच्या एकात्मतेचे प्रतीक असलेला भगवा झेंडा लाल किल्ल्यावर फडकवण्यासाठी ‘वसुधैव कुटुंबकम’ ही जीवन पद्धती स्वीकारत प्रयत्न केले पाहिजेत. हिंदुस्थानची वाटचाल असंख्य वर्षांची आहे.
आपला राष्ट्रध्वज तिरंगा आहे. संविधान मानले पाहिजे. मात्र, या देशाचा झेंडा केवळ सूर्यकेतू म्हणजेच उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी भगवा झेंडा आहे. स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज लाल किल्ल्यावर फडकवण्यासाठी संघटित होऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे संभाजी भिडे यावेळी म्हणाले. राणेनगर परिसरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे ५१ फूट हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यावेळी आयोजक सागर देशमुख उपस्थित होते.

छत्रपतींनी लढवय्या समाज निर्माण केला
छत्रपती शिवाजी महाराजांनी व छत्रपती संभाजी महाराजांनी परिस्थितीसमोर हताश होणारा समाज नाही तर, परिस्थितीसमोर संघर्ष करणारा, लढणारा समाज निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा पुढे चालवण्यासाठी हिंदुस्थानशी असलेले नाते सोडता कामा नये, असेही संभाजी भिडे यांनी यावेळी सांगितले.

स्वराज्याचे आरमार अजिंक्य ठेवा
‘आंब्या’च्या वक्तव्यावर भिडे ठाम
आंबा खाऊन मुलं होतात, या वक्तव्यावर संभाजी भिडे हे ठाम आहेत. त्यांनी नाशिक येथील कार्यक्रमात या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. मी आंबे खाऊन मुले होतात, असे बोललो होतो. मी एक आंब्याचे झाड लावले आहे. तिथे आजही तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता. त्या वक्तव्यावरून माझ्यावर खटला सुरू आहे, हे सांगायला भिडे विसरले नाहीत. त्याचवेळी त्यांनी या वक्तव्याला प्रसिद्धी देणा-या आणि सवाल करणा-­या माध्यमांवर आगपाखड केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR