लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील ज्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी कार्ड) साठी नोंदणी केली आहे. त्या महिला गेल्या दोन दिवसापासून मध्यवर्ती बसस्थानकात रांगेत येऊन उभा रहात आहेत. पण सर्व्हर बंद मुळे स्मार्ट कार्ड वितरण थांबले आहे. कार्ड वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाकडून कोणतीही माहिती नागरीकांना देण्यात येत नसल्याने, गेल्या दोन दिवसापासून संभ्रम व नाराजी नागरीकांकडून व्यक्त होत आहे.
शासनाने एनसीएमसी कार्डच्या नोंदणीसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदवाढ दिली होती. जिल्हयात जवळपास ४ लाख च्या आसपास जेष्ठ नागरीक, महिलांनी नोंदणी केली आहे. स्मार्ट कार्ड न काढलेल्या महिला व जेष्ठ नागरीकांना दि. १ सप्टेंबर पासून पूर्ण टिकीट आकारणी सुरू झाली आहे. हा आर्थिक फटका दूर व्हावा म्हणून नागरीक लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात नोंदणी करण्यासाठी गर्दी करत आहेत. तसेच ज्यांनी गेल्या २ महिण्यापूर्वी नोंदणी केली आहे. अशा महिला व जेष्ठ नागरीकांना तुमचे स्मार्ट कार्ड तयार आहे, ते घेऊन जावे म्हणून संदेश पाठवले जात आहेत. मात्र नागरीक प्रत्यक्ष कार्ड घेण्यासाठी रांगेत उभा राहिल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून कार्ड वितरण करण्याचे सर्व्हर बंद असल्याचे संमजताच ३० ते ४० किलोमिटरहून आलेल्या महिला व नागरीकांचा अपेक्षा भंग होत आहे.
















