मुंबई : प्रतिनिधी
मराठवाड्यात पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने विभागातील दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान तब्बल ४३ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. या काळात पिकांना आवश्यक पाऊस न मिळाल्याने खरीप पिकांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
मराठवाड्यातील ४९६ मंडळांपैकी २१८ मंडळांमध्ये ५० ते ७५ टक्के म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. मात्र, तब्बल २७८ मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. याचा थेट परिणाम या मंडळांतील गावांमधील खरीप पिकांवर झाला आहे. पावसाचा खंड वाढत गेल्याने जमिनीतील ओलावा कमी होत असून, पिकांना पाण्याचा ताण जाणवत आहे.
१ ऑगस्टपासून १२ सप्टेंबरपर्यंत ४२ दिवसांचा पावसाचा खंड राहिला. खरीप पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात एवढा मोठा खंड पडल्याने शेतक-यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह विविध पिकांना या पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे. काही भागांत पिकांची वाढ खुंटली असून, उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरासरीच्या केवळ ५७ टक्के पाऊस
मराठवाड्यात १२ सप्टेंबरपर्यंत सरासरी पर्जन्यमानाच्या केवळ ५७ टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच तारखेपर्यंत विभागात सरासरीच्या १०६.३८ टक्के पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदाची पावसाची स्थिती अत्यंत कमकुवत आहे.
पाणीसाठ्यात मोठी घट
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या ६७.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा साठा ९६.६८ टक्के होता. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा लक्षणीय कमी आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाने दमदार पुनरागमन केले नाही तर पिण्याचे पाणी, सिंचन आणि रब्बी हंगामासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरू शकते
९३ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी
मराठवाड्यात सरासरी ९३ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. मात्र, पेरणीनंतर पावसाने मोठी ओढ दिल्याने उभ्या पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास पिकांच्या उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
परभणी, लातूरमध्ये मोठी तूट
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती अधिक चिंताजनक आहे. विशेषत: परभणी आणि लातूरमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० टक्क्यांहून अधिक पावसाची तूट असल्याचे समोर आले आहे. पावसाच्या खंडाचा सर्वाधिक परिणाम कोरडवाहू शेतीवर होण्याची शक्यता आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटणे, फुलोरा व शेंगा लागण्यावर परिणाम होणे आणि उत्पादनात घट येण्याची चिंता शेतक-यांना आहे.
महसूल यंत्रणेला अहवालाचे आदेश
पावसाच्या या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी ऑनलाईन बैठकीद्वारे मराठवाड्यातील पाऊस, पेरणी, धरणांतील जलसाठा आणि चारा उपलब्धतेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करावी आणि १४ सप्टेंबरपर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या पाहणीत पिकांची सद्यस्थिती, पावसाचा परिणाम, पाण्याची उपलब्धता आणि पशुधनासाठी चा-याची परिस्थिती याची माहिती घेतली जाणार आहे.
५५ लाख जनावरांसाठी १.०७ कोटी टन चारा
मराठवाड्यात सध्या ५५ लाख ६६ हजार जनावरांसाठी सुमारे १ कोटी ७ लाख मेट्रिक टन चारा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मात्र, पावसाची ओढ कायम राहिल्यास हिरवा चारा उपलब्ध होण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पीक परिस्थितीसोबतच पशुधनासाठी चा-याची उपलब्धता आणि भविष्यातील गरज याचाही प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे.
आता प्रशासनाच्या पाहणी अहवालाकडे लक्ष
पावसाचा ४२ दिवसांचा खंड, ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेली २७८ मंडळे आणि ५५६० गावांतील परिस्थिती यामुळे मराठवाड्यात खरीप हंगाम अडचणीत आला आहे. आता महसूल आणि कृषी विभागाच्या प्रत्यक्ष पाहणी अहवालानंतर पीक नुकसान, पाणीटंचाई आणि शेतक-यांना आवश्यक उपाययोजनांबाबत शासनाकडून कोणते निर्णय घेतले जातात, याकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे.
















