मुंबई : प्रतिनिधी
सलमान खान नावच पुरेसे आहे. सलमानचे नाव जिभेवर येताच मनात अनेक गोष्टींचा विचार सुरू होतो. सलमान हिंदी सिनेसृष्टीतील सर्वांत यशस्वी सुपरस्टारपैकी एक आहे. २७ डिसेंबर रोजी ‘दबंग’ खान आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे.
हिंदी सिनेसृष्टीत सलमान खानचे चांगलेच वर्चस्व आहे. सलमान ज्या व्यक्तीवर आपला हात ठेवतो, त्या व्यक्तीचे नशीब उजळते, असे म्हटले जाते. आजच्या काळात लोक त्याच्याशी पंगा घेण्यास घाबरतात, हेही तितकेच खरे आहे. इंडस्ट्रीत सलमानने जे नाव आणि संपत्ती कमावली आहे, ती त्याने पूर्णपणे स्वत:च्या मेहनतीवर मिळवली आहे. इंडस्ट्रीत त्याचे अनेक अफेअर्स झाले. काही वेळा गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली, पण लग्न होऊ शकले नाही.
सलमानला या गोष्टीचा अजिबात पश्चात्ताप नाही की, त्याचे लग्न झाले नाही. मात्र, तो वडील बनण्याची इच्छा नक्कीच बाळगतो. भाचा अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये सलमानने मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. ट्विंकल खन्ना आणि काजोल यांच्या शोदरम्यानही सलमान खानने सांगितले होते की त्याला वडील व्हायचे आहे. तो म्हणाला होता, एक दिवस मी नक्कीच वडील बनेन. ते मूल माझंच असेल. मुलाचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या घरी अनेक महिला सदस्य आहेत. सलमान वडील बनून आपल्या मुलाचं उत्तम प्रकारे पालनपोषण करायची इच्छा व्यक्त करतो. मात्र त्याच्या आयुष्यात तो दिवस नेमका कधी येईल, याची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागली आहे.

