लातूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी संघटना शेतक-यांना बाजारपेठ व तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. जगभरात शेतक-यांना उच्च उत्पादकता व गुणवत्ता असलेले जणुकीय आदला-बदलीतून निर्मीती केलेले बियाणे वापरास परवानगी दिली आहे. त्या माध्यमातून परदेशातील शेतकरी कमीतकमी उत्पादन खर्चात अधिकाधीक उत्पादन घेऊन नफा मिळवीत आहेत. मात्र त्या उलट भारतीय शेतकरी या तंत्रज्ञानापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी संघटना सविनय कायदेभंग करुन प्रतिबंधीत एचटीबीटी कापसाची लागवड करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
भारतीय शेतकरी जागतीक बाजारपेठेत परदेशी शेतक-यांशी स्पर्धेत कमकुवत ठरत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय अनुसंधान हा नारा देत तंत्रज्ञान स्विकारण्याची घोषणा केलेली आहे. मात्र हे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. जणुकीय बदलातून उत्पादीत केलेली परदेशी दाळ, सोयाबिन तेल, पेंड, आयात करुन खायला चालते, मात्र भारतीय शेतक-यांना उत्पादन करायला बंदी घातली गेली आहे. आता महाराष्ट्र राज्याच्या शेजारी असलेल्या गुजरात राज्यात शेतकरी राजरोसपणे एचटीबीटी कापसाची लागवड करीत आहेत, मात्र महाराष्ट्रात लागवडीसाठी बंदी घातली आहे. म्हणुन शेतकरी संघटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यात दि. ११ जुलै रोजी प्रातिनिधिक स्वरूपात एचटीबीटी कापसाची लागवड करुन जुलमी कायद्यचा सविनय कायदेभंग करणार आहे, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी लातूर यांना शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, शिरुर अनंतपाळ युवा तालुकाध्यक्ष अर्जून कावळे, संघटक अरुण बिरादार, ज्येष्ठ नेते दगडूसाहेब पडिले, इब्राहिम शेख, गंगाधर बिरादार, मधुकर महापुरे, श्रीनीवास बिरादार, संजिवन बिरादार आदींची उपस्थिती
होती.
















