नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत जाणा-या सहावीतील मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. आज सकाळी शाळेच्या गेटवरच मुलीला चक्कर आल्यामुळे ती खाली कोसळली. शिक्षक अन् शिपायांनी तात्काळ तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सांगितले. श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणा-या श्रेया किरण कापडी या सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना अचानक चक्कर आल्याने ती कोसळली. शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीला आधीपासूनच हृदयाचा त्रास होता.
श्रेया हिच्या जाण्याने कापडी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर नाशिकमध्ये आणि शाळेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रेयाच्या अकाली जाण्याने नाशिककर हळहळले असून कापडी कुटुंबाच्या दु:खात सहभागी झाले आहेत. त्यांना धीर दिला जातोय. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना बसल्या जागी अथवा काम करताना, व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत.
लहान वयात हृदयविकाराचा झटका येणे ही गंभीर बाब आहे, आणि यामागे जन्मजात दोष, आनुवंशिक आजार, जीवनशैली किंवा वैद्यकीय निदानाचा अभाव हे कारण असू शकते. भारतीय लोकांमध्ये हृदयविकाराचा आनुवंशिक धोका जास्त आहे, आणि याचे प्रमाण लहान मुलांमध्येही दिसून येते. लहान मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे अनेकदा गंभीरपणे घेतली जात नाहीत, ज्यामुळे अचानक मृत्यू होण्याचा धोका वाढतो. जीवनशैलीतील बदल हे याचे प्रमुख कारण असू शकते. पाश्चात्त्य जीवनशैलीचा प्रभाव, जंक फूडचे वाढते सेवन आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढला आहे.

