Homeमहाराष्ट्रसहावीसाठी नवा अभ्यासक्रम

सहावीसाठी नवा अभ्यासक्रम

आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीची मंजुरी
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात शालेय शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडणार असून इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

या आधी इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. आता सहावीचाही अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात आला असून येत्या जूनपासून सुरू होणा-या शैक्षणिक वर्षापासून तो लागू केला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित हा आराखडा तयार करण्यात आला असून त्याला सुकाणू समितीने मंजुरी दिली. यानंतर अभ्यासक्रम समन्वय समितीकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाईल.

नवीन अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी बालभारतीवर सोपविण्यात आली आहे. ही पुस्तके येत्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपर्यंत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यात आले असून त्यानुसार शिक्षण अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित शिक्षण देण्याचा सरकारचा उद्देश आहे.

शिक्षकांना विशेष प्रशिक्षण
नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षणही महत्त्वाचे मानले जात आहे. एससीईआरटीतर्फे यासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. यानंतर जिल्हास्तरावर शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाईल, ज्यामुळे नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुलभ होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR