यवतमाळ : प्रतिनिधी
डेसिमल फाउंडेशनच्या वतीने ‘द ब्रेकफास्ट रेव्होल्युशन’ प्रोग्राम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांतील ५० हजारांवर विद्यार्थी, महिला याचा लाभ घेत आहेत.
डेसिमल फाउंडेशनतर्फे ‘ब्रेकफास्ट रेव्होल्युशन’ कार्यक्रम २०१४ पासून राबविला जात आहे. ‘सशक्त माता-सुदृढ बालक’ हा प्रमुख उद्देश असलेला हा उपक्रम यवतमाळ, धुळे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, पालघर, पनवेल, ठाणे, नाशिक, रायगड, नंदुरबार, भिवंडी यांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत, तसेच गुजरात, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या सहा राज्यांत राबविला जात आहे. नीलम जेठवाणी व त्यांचे सुपुत्र डॉ. पंकज जेठवाणी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू झाला. नीलम या दिवंगत सीए शंकर जेठवाणी यांच्या पत्नी असून, ते मूळ यवतमाळचे रहिवासी आहेत. नीलम यांना डॉ. पंकज व डॉ. कमल अशी दोन मुले आहेत. त्यापैकी डॉ. कमल अमेरिकेत वास्तव्यास आहेत. पतीच्या २०११ मधील निधनानंतरही नीलम यांनी सामाजिक कार्याचा ध्यास कायम ठेवला. डॉ. पंकज हे जे. जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना कुपोषित मुले आणि गर्भवती महिलांची उपासमार पाहून अंतर्मुख झाले. मुलांसह मातेलाही पौष्टिक आहार मिळावा, या ध्येयातून आई-मुलाचे विचार जुळून आले आणि ‘ब्रेकफास्ट रेव्होल्युशन’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.
आज या उपक्रमाशी ४०० संस्था जोडल्या असून, ७०० केंद्रांद्वारे ५० हजारांहून अधिक लाभार्थ्यांना सकस आहार पुरविला जात आहे. अंगणवाडी, शाळा, शेल्टर हाऊस, हॉस्पिटल आदी ठिकाणी ज्वारी, बाजरी, भरडधान्यांसह (मिलेट्स) पोषक आहारतज्ज्ञ डॉक्टर्सच्या सल्ल्याने तयार करून दिला जातो.

