सांगली : प्रतिनिधी
सांगलीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला. भरधाव बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बसचालकाचा समावेश आहे. अपघाताची ही घटना पलूसच्या घोगाव येथे घडली. या अपघातामध्ये बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या पलूस तालुक्यातील घोगाव येथे खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला. भरधाव बसवरील चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये १५ हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. मृतांमध्ये बसचालक आणि क्लीनरचा समावेश आहे.
कराड-तासगाव मार्गावर हा अपघात झाला. भरधाव बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणा-या झाडावर जाऊन बस आदळी. ज्यामध्ये बसचालकासह क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. कराड-तासगाव मार्गावरील रस्त्याचे काम अपूर्ण असून अरुंद रस्त्यामुळे अचानक वेग कमी करावा लागल्याने हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
















