27.3 C
Latur
Thursday, June 12, 2025
Homeमहाराष्ट्रसांगलीत मतदान घटल्याचा फटका संजयकाकांना की विशाल पाटलांना?

सांगलीत मतदान घटल्याचा फटका संजयकाकांना की विशाल पाटलांना?

सांगली : डॉ. राजेंद्र भस्मे
लोकसभा मतदारसंघात अंतिम मतदान ६०.९५ टक्के झाले. गत निवडणुकीत म्हणजे २०१९ मध्ये ६५ टक्के मतदान झाले होते. मात्र, या लोकसभेत मतदानात चार टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या घटलेल्या टक्क्याचा फटका कोणाला बसणार? विजयी कोण होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एका बाजूला उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली असल्याचे चित्र आहे.

सांगली लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात जत, तासगाव, खानापूर, पलूस, सांगली आणि मिरजचा समावेश आहे. त्यापैकी पलूस आणि जत विधानसभेत काँग्रेसचे आमदार आहेत. तर तासगाव राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. खानापूरमध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत. तर सांगली आणि मिरजमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे दोन आमदार काँग्रेस आणि भाजपचे आहेत. तर एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेना शिंदे गटाचे आहेत.

निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने सुरुवातीस माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र अंतिम टप्प्यात तो काढून घेऊन विशाल पाटील यांना देण्यात आला. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मात्र जाहीर प्रचाराचा एकहाती किल्ला लढवला. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील या त्यांच्याबरोबर प्रचारात होत्या.

शेवटच्या टप्प्यात प्रकाश आंबेडकर यांनी मिरज येथे जाहीर सभा घेतली, ही निवडणूक तिरंगीऐवजी दुरंगीच झाल्याची बोलले जात आहे. मात्र, गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत चार टक्क्यांनी मतदान घटले आहे. मुळात, मतदानाचा टक्का घटला की, विद्यमान खासदारांना याचा फायदा होतो, असे चित्र असते. परंतु या वेळेस चित्र उटले होणार का? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

स्वातंत्र्यापासून तब्बल साठ वर्षे सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९७७ मधील काँग्रेसविरोधी लाटेतही काँग्रेसचा हा गड शाबूत होता. तब्बल बारा वेळा सांगलीमधून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील १९८० साली सांगलीचे खासदार झाले. त्यानंतर साडेतीन दशके वसंतदादांच्या घराण्यातील व्यक्ती सांगलीचा खासदार होती. २०१४ साली मोदी लाटेत पहिल्यांदा सांगलीतून भाजपा उमेदवार विजयी झाला. संजयकाका पाटील यांनी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव केला. २०१९ च्या निवडणुकीमध्ये सांगलीची जागा काँग्रेस महाविकास आघाडीत राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला गेली. वसंतदादा घराण्यातील विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र या ठिकाणी वंचितकडून गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या मैदानात उतरले, भाजपाचे संजयकाका पाटील, स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर, अशी तिरंगी लढत होऊन वंचितच्या फॅक्टरमुळे विशाल पाटलांचा संजयकाका पाटील यांनी दीड लाख मतांनी पराभव केला. धनगर आरक्षणाच्या भाजपविरोधात असणारा रोष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचे आकर्षण यामुळे गोपीचंद पडळकर यांना तीन लाख मते या निवडणुकीत पडली होती. विशाल पाटलांना ३ लाख ४४ हजार ६४३ आणि संजयकाकांना ५ लाख ८ हजार ९९५ इतकी मते मिळाली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून संजयकाका पाटील पुन्हा एकदा रिंगणात आहेत. महाविकास आघाडीमध्ये ही जागा आपल्याला मिळावी म्हणून काँग्रेसचा आग्रह होता. काँग्रेसने शेवटपर्यंत प्रयत्न करूनही त्यांना ही जागा ताब्यात घेण्यात अपयश आले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्यांबरोबर स्थानिक प्रश्नही महत्त्वाचे ठरणार आहेत. जतच्या पाण्याचा प्रश्न, ६५ गावांच्या विस्तारीत म्हैसाळ सिंचन योजना, ड्रायपोर्ट, एअरपोर्ट, रस्ते, मोठ्या उद्योगांचा जिल्ह्यात अभाव यासह काँग्रेस पक्षावर झालेला अन्याय हे मुद्दे येथे महत्त्वाचे ठरणार आहेत. सांगली लोकसभा निवडणुकीत वाघ कोण? हा मुद्दा गाजला. उद्धव ठाकरे राज्याचे वाघ असतील तर आपण सांगलीचे वाघ आहोत, असा दावा काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केला होता. त्यावर विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाही, हे चार जूनलाच कळेल, असे उत्तर संजय राऊत यांनी दिले. त्यावरील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी या निवडणुकीत चांगल्याच गाजल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR