अहिल्यानगर : प्रतिनिधी
शनि शिंगणापूर येथे बनावट वेबसाईटचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता शिर्डी साई संस्थानच्या नावाशी साधर्म्य असलेली बनावट वेबसाईट तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
साई दर्शनासाठी शिर्डीत वर्षाकाठी करोडो तर दररोज हजारो भाविक येत असतात. अनेक भाविक वास्तव्यासाठी साई संस्थानच्या भक्त निवासाला प्राधान्य देतात. अर्थात असुविधा टाळण्यासाठी भाविक शक्यतो साई संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन रूम बुकिंग करतात. मात्र याचाच गैरफायदा काही अपप्रवृत्तींनी घेतला असून साई संस्थान भक्तनिवासाच्या नावाने बनावट वेबसाईट बनवण्यात आल्याचे समोर आले आहेत.
दरम्यान मागील काही दिवसांपासून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कर्नाटक राज्यातील रामू जाधव या भाविकासोबत असाच फसवणुकीचा प्रकार घडला आहे. रामू जाधव यांच्या नातवाचा वाढदिवस असल्याने ते कुटुंबासह साई दर्शनाला शिर्डीकडे निघाले. त्यांच्या मुलाने वास्तव्यासाठी गुगलवर जाऊन शिर्डी भक्तनिवास सर्च केल्यानंतर साई संस्थान भक्तनिवास नावाने एक वेबसाईट निदर्शनास आली.
साई संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून त्याने रूम बुकिंगसाठी विचारणा केली असता त्याला व्हॉट्सअॅपवर एक स्कॅनर आले. त्यावर पेमेंट केल्यानंतर संबंधिताने तुम्ही भक्त निवासाच्या काऊंटरवर आल्यावर पावती देतो असे सांगितले. मात्र ज्यावेळी जाधव कुटुंब शिर्डीत साई संस्थानच्या भक्तनिवासात पोहोचले, तेव्हा आपल्या नावे बुकिंगच नसल्याचे समजले. गोंधळलेल्या जाधव यांना साईबाबा संस्थानच्या कर्मचा-यांनी धीर देत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर साईभक्तांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला.
















