शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
साकोळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जन आरोग्य समितीची मासिक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत गावातील आरोग्यविषयक विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांबाबत जनजागृती, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, माता व बाल आरोग्य सेवा तसेच शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देण्यात आला. गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा वेळेत पोहोचण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीत ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि जन आरोग्य समितीच्या सदस्यांनी गावातील आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करून त्यावरील उपाययोजनांबाबत सूचना मांडल्या. गाव स्वच्छ, निरोगी आणि रोगमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीस जि.प.सदस्य माणिक गायकवाड, पं.स. सदस्या मीना लांडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख, डॉ.पुनम येलूरकर, डॉ. निलेश तांदळे, जन आरोग्य समितीचे सदस्य, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















