शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून १५ वा वित्त आयोगाचा निधी व ग्रामनिधीचा अपहार झाल्याबाबत राजकुमार कल्याणराव बरगे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये नियम डावलून निधी खर्च करण्यात आला. काही कामे प्रत्यक्षात न करता केवळ कागदोपत्री दाखवून बिले काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अंदाजपत्रक, ठराव, कामाचे मोजमाप (एम.बी.), बिले व देयके यामध्ये तफावत असल्याचेही माहिती अधिकारात अर्धवट माहिती दिल्याचे आशिष गंगाधर धुमाळे यांनी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

