शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
साकोळ मध्यम प्रकल्पातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणा-यांविरोधात शिरूर अनंतपाळ प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे २० पाणी उपसा मोटारींसह केबल वायर जप्त करण्यात आल्या. कारवाईचा धसका घेत काही शेतक-यांनी घटनास्थळावरील सुमारे ५० मोटारी स्वत:हून काढून नेल्या.
साकोळ मध्यम प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने संयुक्त पथकाच्या माध्यमातून ही धडक कारवाई केली. या मोहिमेत महसूल विभाग, पोलीस विभाग, महावितरण, जलसंपदा विभाग आणि ग्रामविकास विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला. मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि महसूल सेवकही कारवाईत सहभागी झाले होते. प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृत वापर रोखणे आणि उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे, या दृष्टीने प्रशासनाने ही मोहीम राबवली. विविध विभागांच्या समन्वयातून झालेल्या या कारवाईमुळे अवैध पाणी उपसा करणा-यांचे धाबे दणाणले आहेत. अवैध पाणी उपशाविरोधात प्रशासनाने उचललेल्या या कठोर पावलांमुळे प्रकल्पातील पाणी वापरावर नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
















