पुणे : प्रतिनिधी
महागाईने सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणा-या साखर, कांदा आणि खाद्यतेलाचे दर चढेच आहेत. त्यामुळे यंदा सणांमधील मिठाई आणि फराळाचा खर्च नागरिकांच्या खिशाला चांगलाच भार देणार आहे. विशेषत: साखरेच्या बाबतीत घाऊक बाजारात दरात काहीशी नरमाई आली असली तरी त्याचा लाभ किरकोळ बाजारातील ग्राहकांपर्यंत पोहोचताना दिसत नाही.
घाऊक बाजारात साखरेचा दर ४८ ते ४९ रुपये किलो असताना किरकोळ बाजारात ती अद्याप ५३ ते ५५ रुपये किलो दराने विकली जात आहे. सणासुदीच्या काळात मिठाई तसेच घरगुती पदार्थांसाठी साखरेचा वापर वाढतो. त्यामुळे वाढलेल्या दरांचा थेट परिणाम घरगुती अर्थसंकल्पावर होत आहे.
दुधासह रोजच्या गरजेच्या वस्तूही महाग
महागाईचा दबाव केवळ साखर, कांदा आणि खाद्यतेलापुरता मर्यादित नाही. दुधासह रोजच्या गरजेच्या अनेक वस्तूंचे दरही चढेच आहेत. सणासुदीच्या काळात कुटुंबांचा खर्च नेहमीच्या दिवसांच्या तुलनेत वाढतो.
याचा परिणाम लवकरच किरकोळ बाजारातही दिसेल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही. किरकोळ बाजाराकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याने ग्राहकांना कोणताही दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, कांद्यासह भाज्यांचे वाढलेले दरही कुटुंबांच्या एकूण खर्चात भर घालत आहेत.
फराळाचे पदार्थ महागले
दरम्यान, मिठाई, फराळ, पूजा साहित्य आणि घरगुती गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसोबतच खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या दरांनी नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. एकूणच, साखर ५३ ते ५५ रुपये, कांदा सुमारे ५० रुपये आणि सोयाबीन तेल सुमारे १७२ रुपये किलो दराने विकले जात असल्याने यंदा सण साजरा करणे महागणार आहे.
कांदाही ५० रुपये किलो
कांद्याच्या वाढलेल्या दरामुळेही नागरिक त्रस्त आहेत. बाजारात कांदा सुमारे ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. दैनंदिन जेवणात नियमित वापरल्या जाणा-या कांद्याचे दर वाढल्याने त्याचा थेट परिणाम स्वयंपाकघराच्या बजेटवर होत आहे.
सोयाबीन तेल १७२ रुपयांखाली नाही
साखर आणि कांद्याप्रमाणेच खाद्यतेलाचे दरही नागरिकांना झटका देत आहेत. सोयाबीन तेल सुमारे १७२ रुपये किलो, शेंगदाणा तेल १९० रुपये, राईस बॅन तेल १७३ रुपये, तर मोहरीचे तेल २०० रुपये किलो दराने विकले जात आहे. सध्या या दरांमध्ये घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
















