खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या साखरेची साठा मर्यादा जैसे थे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून साखरेच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले होते. लोक साखरेच्या वाढत्या किमतींमुळे चिंतेत होते. त्यातच आता साखरेच्या दरात २५ टक्क्यांची घसरण झाली आहे. दरम्यान, आता सरकारने साखर साठा करण्याच्या नियमांत बदल केले आहेत. या नव्या बदलानुसार साखर खरेदीदारांना साठा करण्याची मर्यादा १५ दिवसांवरून ३० दिवसांपर्यंत वाढविली आहे. या निर्णयामुळे साखरेच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या साखरेच्या साठा मर्यादेत कोणताही बदल होणार नाही.
केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणा-यांसाठी साठा करण्याची मर्यादा आता ३० दिवसांपर्यंत वाढविली. मात्र, अतिरिक्त साखर साठा केवळ आयात केलेल्या साखरेतूनच खरेदी केला जाऊ शकतो, अशी अट घातली आहे. याचा अर्थ केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साखर वापरणा-या कंपन्यांसाठी साठा करण्याची मर्यादा वाढविली आहे.
पूर्वी अशा कंपन्या केवळ १५ दिवसांसाठीच साखरेचा साठा करू शकत होत्या. परंतु १५ दिवसांपेक्षा जास्त असलेला कोणताही अतिरिक्त साठा केवळ आयात केलेल्या साखरेतूनच आला पाहिजे. ही साखर आगाऊ प्राधिकृत योजना आणि दरपत्रक कोट्याअंतर्गत खरेदी करणे आवश्यक आहे. खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या साखरेच्या साठा मर्यादेत कोणताही बदल होणार नाही. ती १५ दिवसांपर्यंत मर्यादित राहील. दरम्यान, साखरेच्या वाढत्या दरामुळे गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
साखरेच्या किरकोळ
दरात आता घट
बाजारात साखरेच्या किरकोळ दरात अंदाजे १० टक्क्यांनी घट झाली. यानंतर, सरकारने व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांना कारखान्याच्या दरातील साखरेचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे. या महायोजनेनुसार साखरेच्या किमती लवकरच आणखी कमी होतील, असे सरकारचे म्हणणे आहे.
















